आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:निम्मा मान्सून सरला, मराठवाड्यात सरासरीपेक्षा 48 टक्के जास्त पाऊस, जलसाठ्यात 14 टक्क्यांनी वाढ

औरंगाबाद /3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक

मान्सूनचा दाेन महिन्यांचा निम्मा हंगाम संपला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १ जून ते ३० जुलैदरम्यान एकूण १४८ टक्के पाऊस झाला. म्हणजे सरासरीपेक्षा ४८ टक्के जास्त पाऊस बरसला. धरणातील जलसाठा ३२ वरून ४६ टक्क्यांवर गेला. यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिके जोमात आहेत. विहिरी, बोअरवेल, शेततळ्यात पाणी आल्याने आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण आहे.

गतवर्षी संपूर्ण मान्सून हंगामासाठी हवामान अनुकूल होते. चारही महिन्यांत धो-धो पाऊस पडला. एका दशकानंतर प्रथमच मराठवाड्यातील प्रकल्पात ९२ टक्के जलसंचय झाल्याची नोंद जलसंपदा विभागाने घेतली होती. त्यानंतर परतीचे व बेमोसमी पाऊसदेखील पडले. यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील धरणात उन्हाळा संपून पावसाळ्याचा हंगाम सुरू होईपर्यंत ३२ टक्के जलसाठा शिल्लक राहण्याची प्रथमच नोंद झाली. २०१९ मध्ये २६ टक्के, तर त्याअगोदर खूपच कमी पाणीसाठा होता. उन्हाळ्यात बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडतात. टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, गतवर्ष यास अपवाद ठरले व टँकरमुक्त गाव होण्याची नोंद झाली. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीइतका पडणार असल्याचे भाकीत हवामानतज्ज्ञ, हवामान संस्थांनी वर्तवली होते.

कुठे काय स्थिती
- मोठे प्रकल्प ११. यापैकी ३ धरणांत २५ टक्क्यांपेक्षा कमी
- मध्यम ७५ पैकी ९ प्रकल्प जोत्यात, २८ मध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी, तर २१ मध्ये २५ ते ५० टक्केदरम्यान जलसंचय
- लघु ७५३ पैकी ३० आजही कोरडेठाक आहेत. १९२ जोत्यात असून २४६ मध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी, तर ९४ प्रकल्पांत २५ ते ५० टक्केदरम्यान आणि ६१ मध्ये ७५ टक्के, तर १३० प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर जलसंचय

स्थळनिहाय पावसाच्या वितरणात कमालीचा फरक
हवामान बदलामुळे जेथे पोषक वातावरण आहे त्या काही क्षेत्रातच धो-धो पाऊस पडतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडलेला आहे. विशेषत: ४२१ पैकी १९५ मंडळांत अतिवृष्टी झालेली आहे, तर उर्वरित मोठ्या क्षेत्रावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. सर्वदूर एकसारखा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जेथे अतिवृष्टी झाली अशाच ठिकाणची नदी, नाले ओसांडून वाहिले. त्यामुळे मोठ्या ते लघु प्रकल्पात जलसंचयात हळूहळू वाढ होत आहे.

कीड व राेगांचा प्रादुर्भाव
जूनमध्ये खंडाचे प्रमाण जास्त राहिले, तर जुलैचे पहिले १० दिवस अत्यल्प पाऊस पडला. मात्र गत २० दिवसांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. खरीप पिके जोमात आहेत. जेथे अतिवृष्टी झाली तेथे मोठे नुकसानही झालेले आहे. कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...