आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातही कहर:जगात 20 वर्षांत नैसर्गिक आपत्तीतील एकूण मृत्यूपेक्षा कोरोनामुळे 16 महिन्यांत जास्त बळी

औरंगाबाद / अजय कुलकर्णी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना ठरली कमी कालावधीत सर्वाधिक बळी घेणारी महामारी

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ महिन्यांत ३० लाखांवर लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. कोविड-१९ ही कमी कालावधीत सर्वाधिक बळी घेणारी जागतिक महामारी ठरली आहे. गेल्या दोन दशकभरात नैसर्गिक आपत्तीत जेवढे एकूण बळी गेले त्यापेक्षा जास्त मृत्यू कोरोनाने झाले असल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आपत्ती जोखीम निवारण (यूएनओडीआरआर) कार्यालयाच्या अहवालानुसार जगात २००० ते २०१९ या काळात १० सर्वाधिक विध्वंसक नैसर्गिक आपत्तीत ९.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाने गेल्या १६ महिन्यांत १५ एप्रिलपर्यंत जगात ३०.०३ लाख बळी घेतले आहेत. सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत आजारांच्या यादीत कोरोना तिसरा क्रमांकावर आला आहे.

यूएनओडीआरआरच्या अहवालानुसार, जगाने २००० ते २०१९ मध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती अनुभवल्या. त्यापैकी सर्वाधिक विध्वंसक आपत्तीत या दशकात ९.४ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात २००४ ची हिंदी महासागरातील सुनामी, २००८ चे म्यानमारमधील नर्गिस चक्रीवादळ तसेच २०१०चा हैतीमधील भूकंप या विनाशकारी आपत्तींचा समावेश आहे. कोरोनाने या सर्वांवर मात करत १६ महिन्यांच्या अल्प कालावधीत ३० लाखांवर लोकांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे एड्समुळे २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत २०.४ लाख बळी गेले आहेत, तर क्षयरोगामुळे गेल्या दोन वर्षांत २९ लाख मृत्यू झाले आहेत.

भारतातही थैमान : भारतात कोरोनाने १५ एप्रिलपर्यंत १,७५, ६७३ बळी घेतले आहेत. भारतात २०००-२०१९ या दशकांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीतील मृत्यूंपेक्षा दुप्पट बळी कोरोनाने घेतले आहेत. यूएनओडीआरआरच्या अहवालानुसार, गेल्या दोन दशकांत भारतात एकूण ३२० विघातक नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली. त्यात ७९,७३२ लोकांचे बळी गेले. भारतात सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत रुग्ण आणि बळींची संख्या घटली त्यानंतर मार्चपासून रुग्ण व मृत्यू वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

मृत्यूच्या बाबतीत कोरोना तिसऱ्या स्थानी
वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनने या संदर्भातील आकडेवारी १५ एप्रिल रोजी जारी केली. त्यानुसार १५ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात हृदयरोग, स्ट्रोक या आजारानंतर कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत्यूच्या बाबतीत कोरोना तिसऱ्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...