आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला आणखी खिंडार पडेल:भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा, भीतीमुळेच ठाकरे जोरदार भाषणं करत असल्याची टीका

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला आणखी खिंडार पडणार आहे, असा दावा आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आणखी काही जण सोडून जाण्याच्या भीतीमुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता जोरदार भाषणे करत आहे, अशी टीकाही बावनकुळेंनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेसह मविआवर जोरदार टीका केली.

कुणीही नाराज नाही

बावनकुळे म्हणाले, शिवसेनेला आणखी खिंडार पडणार आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही जण नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, असे काहीही नाही. जुन्या सरकारपेक्षा आताचे सरकार कधीही चांगले, अशीच आता जनतेची व आमदारांचीही भावना आहे.

विधानसभेत 200+ चे लक्ष्य

बावनकुळे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गट व भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून येतील. तसेच, लोकसभेत 45हून अधिक खासदार निवडून येतील. महाराष्ट्रात आता पुन्हा पूर्णवेळ काम करणारे सक्षम सरकार आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी भाजप व शिंदे गट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 51 टक्के जागा जिंकेल.

मंत्री 98 विधानसभा क्षेत्रांत जाणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. याबद्दल बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ बारामतीच नव्हे तर राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री या मतदारसंघात जाणार आहेत. केंद्राच्या योजना या मतदारसंघातील सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय राज्यातील 98 विधानसभा क्षेत्रांतही राज्यातील मंत्री जाणार असून त्या जागा पूर्ण ताकदीने लढण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे.

आगामी निवडणुका शिंदे गटासोबतच

बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणूक भाजप शिंदे गटासोबतच लढणार आहे. याबद्दल कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. मविआचे काय होईल, हे सांगता येत नाही.

335 सरपंच निवडून आले

राज्यातील एकूण 608 ग्रामपंचायतींमधून भाजप व शिंदे गटाचे जवळपास 335 सरपंच निवडून आले, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. बावनकुळे म्हणाले, भाजपचे 294 सरपंच निवडून आले आहेत. हे सरपंच भाजपच्या कोणत्या पदावर होते, याची माहिती माझ्याकडे आहे. तसेच, शिंदे गटाचे 41 सरपंच निवडून आले आहेत. यातून जनता मागच्या सरकारच्या कंटाळली होती, हेच दिसून आले आहे.

मविआचे दुर्भाग्यपूर्ण निर्णय

बावनकुळे यांनी सांगितले की, मविआने सत्तेत येताच मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होता. त्यामुळे बजेटमध्ये मराठवाडा, विदर्भासाठी किती कोटींची तरतूद करायची, हेच स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे या विभागांचा अनुशेष भरुन काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच पुन्हा वैधानिक विकास मंडळ सुरु करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...