आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड:पसार मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा, झटापटीत महिला पोलिस जखमी, ठिकठिकाणी मनसैनिक ताब्यात

औरंगाबाद/मुंबई/पुणे/ कोल्हापूर/नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशपांडेंसोबतचे साळवी पोलिसांच्या ताब्यात

मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेले मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस सध्या त्यांचा शोध घेत असून याच कामासाठी ते शिवतिर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांच्यावरही गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यासोबत असलेले साळवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तत्पुर्वी पुण्यात खालकर मंदिरात आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठन केले. या मंदिराच्या बाजुलाच मशिद असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठन होताच काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील आजच्या स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला.

पुण्यात मनसैनिकांना ताब्यात घेताना पोलिस.
पुण्यात मनसैनिकांना ताब्यात घेताना पोलिस.

मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या निवासस्थानामधून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस देशपांडे यांच्याकडे पोहोचेपर्यंत ते आपल्या गाडीत बसले होते. त्यानंतर पोलिसांनी वेगाने धाव घेत त्यांना गाडीतून ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत गाडीचा धक्का लागल्याने एक महिला पोलिस कर्मचारी खाली पडून जखमी झाल्या. तेव्हाच संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीतून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या घरासमोरच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

धुळ्यातदेखील मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद
मनसे प्रमुख राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी ते पत्रकार परिषद होईल, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. आजच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी राज्यात मशिदींनी आवाजाची मर्यादी पाळली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पत्रकार परिषदेत काय बोलतात, आपल्या पुढील सभेची ते माहिती देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज राज्यात काही अपवाद वगळता बहुतांश भागांतील मशिदींनी आवाजाच्या मर्यादेचे पालन केल्याचे समोर येत आहे.

मनसेच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मनसेच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ठाण्यात लाऊडस्पीकरवर वाजवली हनुमान चालिसा, 7 महिला ताब्यात

राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर ठाण्यातील चारकोप परिसरात पहाटे 5 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी नमाजच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवली. तर नाशिकमध्ये नमाजच्या वेळी हनुमान चालिसा वाजवल्याप्रकरणी 7 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील अनेक भागांतून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील अनेक भागांतून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

कल्याण, पनवेलमध्ये भोंग्याविना पहाटेची अजान

कल्याण, पनवेल, मुंब्रा या भागांत पहाटेची अजान आज भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर या भागांत अजानसाठी मशिदींनी लाऊडस्पीकर लावले नाही. तर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापुरमध्येदेखील बहुतांश मशिंदींनीदेखील आवाजाची मर्यादा पाळली आहे.

आंदोलनादरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे स्वतः मैदानात उतरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
आंदोलनादरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे स्वतः मैदानात उतरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत.

यावर मनसे नेत्यांकडून मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले जात आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्याला महाविकास आघाडी सरकारकडून धार्मिक रंग दिला जात आहे. मात्र, हा विषय सामाजिक असून सर्वच स्तरातील नागरिकांना याचा त्रास होतो. मुस्लिम बांधवांनी याची दखल घेतल्यामुळे त्यांचे आभार मानतो. मुस्लिम बांधवांनीच राज्य सरकारचा अपप्रचार खोडून काढला आहे, असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे.

औरंगाबादेत शांतता

औरंगाबादेतील सभेतच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत प्रक्षोभक भाषण करून 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत मशिदींसमोर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, औरंगाबादेतील प्रमुख जामा मशिदीसह इतर मशिदींनीही नमाज पठनावेळी आवाजाच्या मर्यादेचे पालन केले. त्यामुळे शहरात मनसैनिकही शांत राहिल्याने कोणताही तणाव निर्माण झाला नाही. याबाबत जामा मशिदीच्या मौलवींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्याकडून नेहमीच नमाज पठनावेळी आवाजाच्या मर्यादेचे पालन केले जाते. यापुढेही या नियमांचे पालन केले जाईल, अशी हमीदेखील त्यांनी दिली.

औरंगाबादमध्ये सभा घेतल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये सभा घेतल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याची गरजच नाही - सुमीत खांबेकर
मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत मागणी केल्यास औरंगाबादेत तणाव निर्माण होईल, औरंगाबादेत दंगल होईल, असे चित्र काहींनी निर्माण केले होते. या मुद्द्यावरून औरंगाबादला बदनाम केले जात होते. मात्र, मुस्लिम बांधवांनी आमच्या आवाहनला प्रतिसाद देत आज शांततेत नमाज पठण केले व सामाजिक सौहार्द काय असते, हे राज्याला दाखवून दिले, अशा शब्दांत औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले. सुमीत खांबेकर म्हणाले की, औरंगाबादेत अनेक मशिदींनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करत नमाज पठण केली. काही मशिदींनी तर भोंग्याविना नमाज पठण केली. त्यामुळे औरंगाबादेत मशिदींसमोर भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्याची आता गरजच राहिली नाही, असे सुमीत खांबेकर म्हणाले.

नागपुरात आवाजाच्या मर्यादेचे पालन
औरंगाबादप्रमाणेच नागपुरमधील जामा मशिदीकडूनही लाऊडस्पीकरवरून कमी आवाजात नमाज पठण करण्यात आली. याबाबत या मशिदीच्या मौलवींनी सांगितले की, आम्ही राज ठाकरेंच्या अल्टीमेटममुळे नव्हे तर नेहमीच याच पद्धतीने कोणालाही त्रास होणार नाही याची दखल घेऊन नमाज अदा करत असतो. यापुढेही या नियमांले पालन करणार असल्याचे मौलवी म्हणाले.

कोल्हापुरमध्येही भोंग्यांविना नमाज पठण
कोल्हापुरमध्येदेखील अनेक मशिदींमध्ये आज भोंग्यांविना नमाज पठण झाले. तणाव निर्माण होऊ नये म्हणून मशिदींसमोर पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. याबाबत मशिदींच्या मौलवींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोल्हापुरमध्ये नेहमीच सर्व समाजांमध्ये सौदार्हाचे वातावरण आहे. सर्व नागरिक सर्व समाजाचे सण मिळून मिसळून साजरे करतात. मशिदींवरील भोंग्यांचा यापुर्वी कधीही हिंदु बांधवांना त्रास झाला नाही व यापुढेही त्रास होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ.

कल्याणमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकर लावले नाहीत
आज कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. कल्याणमधील मशिदींसमोर पोलिसांचा फौचफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखावी व शांतता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये 50हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती. काल रात्रीच मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुलडाण्यात मनसैनिक भोंगे घेऊन परतले
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बुलडाण्यात आज पहाटेपासून मनसैनिक भोंगे घेऊन सज्ज होते. मशिदींनी भोंग्यांवरून अजान पठण केल्यास मनसैनिकांकडूनही भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्यात येणार होती. मात्र, आज बुलडाण्यात बहुतांश मशिदींनी भोंग्यांविना अजान पठण केल्याने या मशिदींसमोरच तैनात असलेले मनसैनिक आपले भोंगे तसेच घेऊन परतले.

राज ठाकरेंनी तेव्हाच लक्ष घालायला हवे होते - छगन भुजबळ
राज ठाकरे यांनी आज ट्विट केलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडिओबद्दल छगन भुजबळ म्हणाले, राज यांनी ट्विट केलेला व्हिडिओ 1995च्या सुमारासचा आहे. तेव्हा उद्धव ठाकरे एवढे क्रियाशील नव्हते. राज ठाकरे अधिक सक्रिय होते. तेव्हाच राज ठाकरेंनी बाळासाहेबांनी मांडलेल्या या भूमिकेबाबत काही तरी करायला हवे होते. त्यांनी तेव्हाच या गोष्टीत लक्ष घातले असते तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे भुजबळ म्हणाले. तसेच, राज्यात शांतता रहावी, यासाठी पोलिस आवश्यक ती कारवाई करत आहे. कोणतीही स्थिती हाताळण्यास पोलिस सक्षम आहेत, असेदेखील छगन भुजबळ म्हणाले.

किशोरी पेडणेकरांची संदीप देशपांडेंवर टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच त्यांनी पळ काढला आहे. यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देशपांडे यांच्यावर टीका केली आहे. या घटनेमुळे कार्यकर्त्यांची मानसिक तयारी कळाली. तरुणांना अशा आंदोलनामध्ये ओढायचे आणि मग नंतर पळ काढायचा. हा विरोधाभास जनता पाहते आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

नंदुरबारमध्ये हनुमान चालिसाचे पठण
आज नंदुरबारमध्ये मनसेच्या वतीने हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील धुळे नाका परिसरात असणाऱ्या हनुमान मंदीरासमोर स्पीकर लावुन मनसेच्या वतीने सुरवातीला हनुमानाची आरती आणि त्यानंतर हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा देखील तैनात केला होता. घटनास्थळी पोलिसांनी आवाज मोजण्याचे डेसिबल मशीन देखील आणले होते. मात्र स्पिकरचा आवाज सौम्य असल्याने पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, नंदुरबारमध्ये मनसेच्या 17 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

हिंगोलीत 100 मनसैनिकांना नोटीसा
हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 100 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या

बातम्या आणखी आहेत...