आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीची परीक्षा म्हटले की घरातील वातावरण एकदम बदलून जाते. पेपरच्या दिवशी कुणाला बाबा, तर कुणाला आई केंद्रावर सोडवायला येतात. परंतु, इथे आई, बाबा नव्हे, तर आपल्या आईच्या पेपरसाठी मुलगा परीक्षा केंद्रावर सोडवायला आला होता. आजवर मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. धुणी-भांडी केली. पण आता मला शिकायचंय, अडचणींवर मात करायची आहे, या ध्येयाने परीक्षा देणाऱ्या आशा थोरात इतरांसमोर आदर्श ठरत आहेत.
शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, याचा प्रत्यय गुरुवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर दिसून आला आहे. आशा थोरात यांच्याप्रमाणे ३३ महिला सध्या प्रौढ विद्यालयातून शिक्षण घेत असून दहावीची परीक्षा देत आहेत.इयत्ता नववीनंतर लग्न झालं. नंतर मुलं झाली, पण शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा तशीच राहिली. घरची परिस्थिती आणि मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट करण्यात दिवस गेले. कधी धुणी-भांडी, तर कधी मिळेल ते काम करत मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला, असे ३८ वर्षीय आशा थोरात यांनी सांगितले. आज मुलीसोबतच त्या दहावीची परीक्षा देत आहेत.
कधी बँकेत, तर कधी बाहेर कामाला गेल्यावर अर्धवट शिक्षणामुळे येणाऱ्या अडचणी, ‘तुला काही येत नाही,’ हे टोमणे स्वस्थ बसू देत नव्हते. त्या वेळी प्रौढ विद्यालयाची माहिती मिळाली आणि घरच्यांनी साथही दिली. मग काय मागे वळून पाहायचे नाही, आता शिक्षण घ्यायचे म्हणून १७ नंबर फॉर्म भरून आज आशाताई दहावीची परीक्षा देत आहेत. नियमित शाळेत जाणे, सराव परीक्षा, शिक्षकांनी समजावलेल्या गोष्टींचा घरी येऊन सराव करायचा. मुलगीदेखील दहावीला असल्यामुळे तिचीदेखील त्यांना अभ्यासात मदत होते. त्यांचे पती रंगकाम करतात. मुलगा द्वितीय वर्षात शिकतो.
अवघ्या २ महिन्यांच्या बाळासह दिली परीक्षा नववीपर्यंतचे शिक्षण सेलू येथे घेतल्यानंतर शब्बू पठाण यांचा विवाह झाला. त्यामुळे शिक्षण अर्धवट सुटले. दहा ते अकरा वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाने संमती दिल्यावर दहावीला प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना बाळ झाल्याने परीक्षा द्यायची की नाही, हा प्रश्न होता. पण, घरचे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन त्या केंद्रावर आल्या अन् परीक्षाही दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.