आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीचे कोरोनामुळे निधन झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांनंतर आई, जुळी मुलगी व मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात आई व मुलीचा मृत्यू झाला, तर मुलगा जखमी अवस्थेत सापडला. अाधी हाताची नस कापून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने गळफास घेतला. दरम्यान, दोघींचा मृत्यू गळफासाने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले तरी संशयास्पद मृत्यूच्या अंगानेदेखील तपास करणार असल्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्पष्ट केले.
समिना रुस्तम शेख (४२), आयेशा रुस्तम शेख (१७) या दोघींचा मृत्यू झाला, तर समीर रुस्तम शेख (१७, सर्व रा. न्यू गणेशनगर, गारखेडा) हा आत्महत्येच्या प्रयत्नात वाचला. समिना तिच्या दोन जुळ्या मुलांसह भारतनगरमध्ये राहत होती. याच परिसरात त्यांचे नातेवाईक राहतात. बुधवारी सकाळी ८ वाजता तळमजल्यावर राहणारा नातेवाईक समिनाच्या घरी गेला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजवूनही कुणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी तो ढकलण्याचा प्रयत्न केला. यात दरवाजाची कडी तुटून दरवाजा उघडला. तेव्हा आई व मुलगी पलंगावर तर मुलगा जमिनीवर पडलेला होता. नातेवाइकांनी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
मात्र नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून अाई व मुलीस मृत घोषित केले. रुग्णालयातून एमएलसी प्राप्त झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, बी. एस. पांढरे, रमेश सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खोलीत पलंगाच्या खाली रक्त पडले हाेते. तर पंख्याला तुटलेल्या अवस्थेत साडी आढळून आली.
पाच दिवसांपूर्वी पतीचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुस्तम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ३१ जुलै रोजी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून समिना तणावाखाली होत्या. मी पतीशिवाय राहू शकत नाही, असे त्या म्हणत होत्या. रुस्तम हे बांधकाम व्यावसायिक होते. २५ वर्षांपूर्वी त्यांचा आंतरधर्मीय प्रेमविवाह झाला होता.
आज नातेवाइकांचा जबाब नोंदवणार
डॉक्टरांच्या प्राथमिक तपासात आई व मुलीचा मृत्यू गळफासाने झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु नातेवाइकांनी मृतदेह थेट रुग्णालयात नेल्याने तिघांची नेमकी अवस्था, ते कसे व कुठे पडलेले होते हे पोलिसांना कळू शकले नाही.
नातेवाइकांच्या माहितीनुसार, दोघी लटकलेल्या तर मुलगा जमिनीवर पडलेला होता. गुरुवारी नातेवाइकांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे. त्याशिवाय घटनास्थळाची सर्व अंगांनी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर नेमक्या निष्कर्षावर येऊन संशयास्पद मृत्यूच्या अंगानेदेखील तपास केला जाईल, असे सहायक निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.
पाच दिवस कसे जगलो आम्हालाच माहीत...
आत्महत्येपूर्वी मुलगी आयेशाने चिठ्ठी लिहिली हाेती. त्यात तिने आजी, भाऊ, मामी, मामाला उद्देशून भावनिक मजकूर लिहिला अाहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यात तिने माँ, अक्का मला माफ कर. मी तुझी आशू, तू आमच्यासाठी खूप काही केलं. आता आम्हाला काही नको. फक्त आम्हाला माफ कर. आमचे पप्पा लांब होते, पण आमच्या डोक्यावर त्यांचा हात होता. आता सगळं संपलं. पाच दिवस आम्ही कसं जगलो हे आम्हालाच माहीत. तू जास्त काळजी करू नको. त्यानंतर तिने “भावंडांची नावे लिहून त्यांची काळजी घ्या, त्यांना चांगले शिकवा. मामा काळजी घे, मामी मला माफ कर, स्वत:ची काळजी घ्या,’ असे म्हणून तिघांची नावे व सह्या केल्या हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.