आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:नाशिकला असलेली जलसंपदाची तिन्ही कार्यालये औरंगाबादला हलवा : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांची राज्य, केंद्राकडे मागणी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुर-मधमेश्वरसह भाम, भावली, मुकणे, वाकी या धरणांचे नियंत्रण नाशिकमधून केले जाते. हे कार्यालय वैजापूर, औरंगाबादच्या नियंत्रणाखाली आणावे. तसेच कोकणातून सुरू हाेणाऱ्या नदी जोड प्रकल्पाचे कार्यालय नाशिकवरून औरंगाबादला आणणे तसेच राष्ट्रीय विकास जलअधिकरणचे केंद्राचे कार्यालयही औरंगाबादला आल्यास मराठवाड्याच्या विकासासाठी ते फायदेशीर आहे. त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार आहाेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी साेमवारी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात पाटबंधारे विभागाची आढावा बैठक डॉ भागवत कराड यांनी घेतली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. के. कुलकर्णी, यांच्यासह पाटबंंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह अनेक अधिकारी हजर होते. यानंतर डाॅ. कराड पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले, ‘गंगापूर- वैजापूरसाठी बांधण्यात आलेल्या धरणांचे नियंंत्रण सध्या नाशिककडे आहे. ते वैजापूर विभाग तसेच कडा औरंगाबाद विभागांतर्गत यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोकणातून नद्या वळवून ते पाणी गोदावरीत आणण्यासाठी हे कार्यालय गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यालय इथे असल्यास इथून त्याचा आढावा घेणे सोपे होईल. केंद्र सरकारअंतर्गत येणारे राष्ट्रीय जलविकास अधिकरण कार्यालय ज्या माध्यमातून प्रकल्पांचे सर्व्हे केले जातात ते देखील औरंगाबादला यावे यासाठी आपण केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करू.’

...तर सर्वपक्षीय जनआंदोलन उभारू
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय नाशिकलाच राहील असे सांगितले हाेते, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असते डाॅ. कराड म्हणाले, ‘आम्ही याबाबत जयंत पाटील यांची भेट घेणार आहोत. तसेच मराठवाड्याला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहाेत. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी मराठवाड्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन प्रयत्न करू. केंद्रीय मंत्री शेखावतांकडे बैठक घेतली जाईल. मात्र हा प्रस्ताव राज्याकडून गेला तर वजन प्राप्त होईल. याला विरोध झाला तर आम्ही सर्वपक्षीय लोकांना घेऊन जनआंदोलन करू.’

कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला मिळावे
विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना २३ टीएमसी पाणी मराठवाड्याला देणार असल्याचे घोषित केले होते. मात्र केवळ सात टीएमसी पाणी मिळाले आहे. मात्र उर्वरित पाणी मिळणे गरजेचे आहे. याबाबत येत्या दीड महिन्यात पुन्हा बैठक लावणार असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले.

४० हजार कोटींसाठी पाठपुरावा करणार
डाॅ. कराड म्हणाले की मराठवाड्याला १६८ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. त्याचे नियोजन कसे असू शकते याची मी माहिती घेतली आहे. नार पार, गिरणा, दमणगंगा, वैतरणा हे सर्व प्रकल्प एक भाग समजून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. समुद्राद्वारे वाहून जाणारे ३२५ टीएमसी पाणी मराठवाडा, नाशिक, विदर्भ, जळगाव, तेलंगणाला मिळू शकते. त्यासाठी केंद्राकडून ४० हजार काेटींचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करू. या प्रकल्पाचा सर्व्हे करण्यासाठी ४५ कोटी रुपये लागणार आहेत. हे पाणी उपलब्ध झाल्यास मराठवाडा- नाशिकमध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...