आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. आपण स्वत:च उमेदवारी नाकारून इतरांना संधी दिल्याचे देसाईंनी बुधवारी सांगितले.
देसाई आता आमदार नसतील, तरीही ते पुढील सहा महिने मंत्रिपदी कायम राहू शकतील. मात्र त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर शिवसेनेकडून देसाईंना थांबवून दुसऱ्या नेत्याची वर्णी लागू शकते. परिणामी काही दिवसांत औरंगाबादचे पालकमंत्रीही बदलू शकतात.
यापूर्वी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात औरंगाबादचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच होते. सुरुवातीला ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांचे फारसे जमले नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या आग्रहावरून पक्षश्रेष्ठींनी कदम यांच्याकडून जबाबदारी काढली व तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचे पालकत्व सोपवले. सावंत हे विधान परिषदेचे आमदार होते. फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांचा कार्यकाळ संपला, त्यामुळे मंत्रिपदही सोडावे लागले. परिणामी काही काळ एकनाथ शिंदेंकडे औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाचा कारभार होता.
‘मातोश्री’च्या जवळचे एकनाथ शिंदेंचे नाव चर्चेत
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. तेव्हा ‘मातोश्री’च्या विश्वासू गोटातील सुभाष देसाई यांच्याकडे औरंगाबादची जबाबदारी सोपवण्यात आली. गेली अडीच वर्षे त्यांच्याकडे जबाबदारी होती. आता पुन्हा ‘मातोश्री’च्या जवळचे एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शिवसैनिकांत चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.