आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:छत्रपती संभाजीनगर दंगलीची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी, सरकारवर विश्वास नाही - खासदार इम्तियाज जलील

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा सरकारवर, सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीची निवृत्त न्यायमूर्तींद्वारे चौकशी करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

13 वाहने, पोलिस 15च कसे?

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत दंगेखोरांनी पोलिसांची 13 वाहने जाळली. मात्र, दंगल झाली त्यावेळी घटनास्थळी केवळ 15 ते 16 एवढेच पोलिस उपस्थित होते. 13 वाहने असूनही केवळ 16च पोलिस घटनास्थळी कसे काय? एका-एका वाहनातून एक-दोन पोलिस कर्मचारी आला होते काय?, असा सवाल करत यांनी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वृत्तवाहिनीशीस बोलताना इम्तियाज जलील यांनी हे आरोप केले.

SITवर विश्वास नाही

इम्तियाज जलील म्हणाले की, दंगेखोरांनी दगडफेक आणि पोलिसांची वाहने पेटवून दिली. या घटनेत 16 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना केली आहे. मात्र, आपला या एसआयटीवर विश्वास नसल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

पोलिसांना येण्यास अडीच तास लागले

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, किराडपुरा भागात दंगल झाली, तेव्हा टवाळखोरांनी पोलिसांची 13 वाहने जाळली. मात्र, या 13 वाहनांमधून केवळ 16 पोलिस कसे काय येऊ शकतात? एवढ्या जमावाला थोपवण्यासाठी फक्त 16 पोलिस पुरतील, असे पोलिसांना कसे काय वाटले? छत्रपती संभाजीनगर शहर हे फार मोठे नाही. तरीही मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळापर्यंत येण्यासाठी पोलिसांना अडीच तास कसे काय लागले?

काळी काळ दंगेखोरांना सुट दिली का?

इम्तियाज जलील म्हणाले, शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीअंतर्गत सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. किराडपुऱ्यात जेथे दगडफेक झाली तेथे पोलिस दिसत आहेत का? मला कोणीही दाखवून द्यावे की, होय घटनास्थळी पोलिस होते आणि ते अशा पद्धतीने दंगेखोरांना रोखत होते. मात्र, दुर्दैवाने तसे झालेले नाही. म्हणजेच दगडफेक करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी दंगेखोरांना एवढी मुदत दिली होती का?, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माजी न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी.

भाजप नेत्यांसाठी वेगळा कायदा?

इम्तियाज जलील म्हणाले की, नामांतरावरील वादामुळे शहरात दंगली झाली, असा आरोप माझ्यावर केला जात आहे. मात्र, नामांतराविरोधात आम्ही 14 दिवस उपोषण केले. त्यादरम्यान, एकही भडकाऊ भाषण कोणी केले नाही. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल केला? पण, हिंदू मोर्चामध्ये भडकाऊ भाषण करण्यात आली. भाजप आमदार अतुल सावे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत ही भडकाऊ भाषणे केली गेली. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आमच्यासाठी वेगळा आणि त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का?