आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजावर संकट:औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत करा, खासदार इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि...

गुलाब वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके ही पाण्याखाली गेली आहे. हातातोंडाशी आलेले पीक हे जमीनदोस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत करा, अशी मागणी जलील यांनी पत्राद्वारे केली आहे.

इम्तियाज जलील यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, 'औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाले. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का? याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन स्थळपाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्या व्यथा माझ्यासमोर मांडल्या' असे म्हणत जलील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले
जलील यांनी पत्रात पुढे लिहिले की, 'औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील स्थळ पाहणीत शेतकरी बांधवांचे उभे पिक वाहून गेल्याचे आणि शेतात गुडघ्या पर्यंत पाणी साचून जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नसल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून कधीही न भरुन निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे. आपण शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.'

बातम्या आणखी आहेत...