आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकानेही घातला नव्हता मास्क:खासदार फिर गलती कर बैठे..!; संचारबंदीचे नियम धुडकावून दौलताबादेत 200 लोकांसह कव्वाली महोत्सवात हजेरी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्यासपीठावर नोटांची उधळण, आयोजकांसह 50 जणांवर गुन्हा; ‘दोषी’ खासदार मात्र नामानिराळेच

‘तसकीन दिल की खातिर तुम बिछड़ते वक्त मुस्कुराते रहो ।
वो जाने वाले दूर जाते हुए पलट के नज़र मिलाते रहो ।।
दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल । तू बोल कफारा क्या होगा ।। ’

असीम राजा यांच्या या प्रसिद्ध कव्वालीतील गीतावर थिरकणारे औरंगाबादचे खासदार पुन्हा एकदा ‘गलती कर बैठे’ असेच म्हणावे लागेल. कारण, काेराेनाचे सर्व नियम माेडून दाैलताबादेतील अंबर फार्महाऊसवर ३ जुलै राेजी रात्री झालेल्या मैफलीत आपल्या अनेक समर्थकांसह हजेरी लावून खासदारांनी त्याचा आनंद लुटला. या वेळी ना खासदारांनी मास्क लावला हाेता ना त्यांच्या समर्थकांनी. जमावबंदी, संचारबंदी, कार्यक्रमबंदी अशा प्रशासनाच्या काेणत्याही निर्बंधांची तमा न बाळगता गाण्यावर थिरकणाऱ्या खासदारांवर अक्षरश: नाेटांची उधळणही हाेत हाेती.

रात्री बाराच्या सुमारास दौलताबाद पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी फार्महाऊस मालक व आयाेजकांसह ५० जणांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, नियमानुसार पाहूण्यांवर गुन्हा दाखल करता येत नसल्याने खासदारांवर गुन्हा दाखल केला नसल्याचे पाेलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले. त्यामुळे नियम माेडूनही खासदार मात्र नामानिराळे राहिले. यापूर्वीही शहरात लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतल्यानंतर ३१ मार्च राेजी खासदार इम्तियाज व त्यांच्या समर्थकांनी औरंगाबादेत नियम धाब्यावर बसवून मिरवणूक काढली हाेती तेव्हाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हाेता.

शनिवारी दौलताबाद रोडवर शेळके मामा धाब्यासमोर असणाऱ्या अंबर फार्म हाऊसवर कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ‘वन व्हाॅइस वन मजलिस’ या व्हॉटसअॅप ग्रुपने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार इम्तियाज जलील हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या सोबत एमआयएमचे नासेर सिद्दिकी, समीर बिल्डर, जमीर कादरी, शेख अहेमद, अबुलहसन हाश्मी, गंगाधर ढगे, रफीक खान व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला कार्यक्रम मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होता. कव्वाली, नाचगाणे सुरू होते. अनेकांनी या कार्यक्रमाचे व्हिडिआे, फेसबुक लाइव्ह देखील केले. ज्यावेळी खासदार इम्तियाज स्टेजवर आले त्यावेळी अक्षरश: त्यांच्यावर पैशाची उधळण झाली.

यांच्याविराेधात गुन्हे दाखल
या कार्यक्रमासंबंधीची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम बंद झाला. याप्रकरणी सोहेल जकिऊद्दीन (४०, रा. बारी कॉलनी), समीर साजेद बिल्डर (रा. बुढीलेन), नासेर सिद्दिकी (४५, रा. अलमगीर कॉलनी), रफीक खान कलीम खान (४०, मकसूद कॉलनी) यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदारांचे मौन
या कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या समर्थकांनी मात्र कार्यक्रमाचे समर्थनच केले. ‘शहरात इतर राजकीय पक्षांकडूनही अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजित होत आहेत त्याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही,’ असे नासेर सिद्दिकी यांनी सांगितले.

म्हणे लाेकांच्या मदतीसाठी कार्यक्रम
एमआयएमचे माजी गटनेते नासेर सिद्दिकी म्हणाले, ‘हा कार्यक्रम मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. एमआयएमचा कार्यकर्ता अज्जू डॉन याचे काेराेना काळात निधन झाले होते. त्याच्या परिवाराला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. या शिवाय निधन झालेल्या तीन कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनाही मदत करण्यात आली.’

बातम्या आणखी आहेत...