आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्देशानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ एप्रिल २३ रोजी पुन्हा एकदा शुद्धिपत्रक जाहीर करून परीक्षा कालावधी वाढवला आहे, त्यामुळे ही परिक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ८ मे २३ रोजीची आहे. अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या मुदतवाढीचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे आयोगाने आता १६ शैक्षणिक अहर्ताधारकांना या परिक्षेसाठी पात्र ठरवले असून न्यायाधिकरणाच्या या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माहिती संचालक, माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक माहिती संचालक आणि सहाय्यक माहिती संचालक या पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांसाठी ३० डिसेंबर २२ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
अॅड्. सुहास उरगुंडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करुन उपरोक्त जाहिरातीतील अट क्रमांक ८.१. आणि सामान्य प्रशासन विभागाच्या १८ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील परिच्छेद क्रमांक ३ ते ५ मध्ये असलेल्या अटींना आव्हान दिले होते.
सुनावणीत अॅड्. उरगुंडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, याचिकाकर्ता हे मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता अंतर्गत संप्रेषण आणि पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधर आहेत. पत्रकारितेत त्यांना १८ वर्षांचा अनुभव आहे व ते उपरोक्त पदांसाठी पात्र आहेत. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील अट क्रमांक ८.१. संविधानाशी विसंगत आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च २३ असल्याचे लक्षात घेऊन न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी प्रतिवाद्यांना तात्काळ म्हणने दाखल करण्याचे आदेश दिले.
तेव्हा लोकसेवा आयोगाने १० एप्रिल २३ रोजी शुद्धिपत्रक काढून परीक्षेचा कालावधी २५ एप्रिल २३ असा वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तेव्हा खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या नवीन मूळ अर्जास तत्काळ प्राधान्य द्यावे असे निर्देश देत याचिकाकर्त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्यास सांगितले. अॅड. उरगुंडे यांच्यामार्फत मॅटमध्ये अर्ज दाखल केला व मॅट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, लोकसेवा आयोगाने केवळ पदवीधरांनाच या परिक्षेसाठी पात्र ठरवले आहे. पदव्युत्तर पदवीधरांना पात्र ठरवलेले नाही.
तेव्हा मॅटचे सदस्य न्यायमूर्ती व्ही. डी. डोंगरे आणि बिजय कुमार यांनी लोकसेवा आयोगाला नोटीस बजावण्याचे आदेश देत तत्काळ जाहिरातीत बदल करण्याच्या सूचना केल्या. आयोगाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून त्यात परिक्षेत पात्र असल्याच्या अटीत एम ए जर्नालीजम आणि मास कम्युनिकेशन यांचा सुद्धा समावेश केला व हे शुद्धिपत्रक मॅटपुढे सादर केले तसेच अर्ज भरण्याचा कालावधी ०८ मे २०२३ हा करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी अॅड्. उरगुंडे यांना अॅड्. रवींद्र वानखेडे यांनी सहकार्य केले तर लोकसेवा आयोगातर्फे अॅड्. एम. पी. गुडे यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.