आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:एमपीएससी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांतून चक्कमोदी सरकारचा प्रचार; काँग्रेसविरोधी प्रश्न; राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीच्या दोन पेपरमध्ये विचारण्यात आले होते प्रश्न

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेपर दोनमधील दोन आक्षेपार्ह उतारे; काँग्रेस असे प्रकार खपवून घेणार नाही

विद्यार्थी आंदोलनाने गाजलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा २१ मार्चला पार पडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांत भाजपचा, विशेषत: मोदी सरकारचा प्रचार करणारे प्रश्न विचारले होते. त्याच वेळी काँग्रेसच्या धोरणावर टीका करणारा उतारा देण्यात आला आहे. एमपीएससीसारख्या प्रतिष्ठित परीक्षांतून अशा प्रकारे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचा प्रचार करणारे व त्याच वेळी विरोधी पक्षांच्या चुकांवर बोट दाख‌णारे प्रश्न विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतात. दोन्ही पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाचे असतात. यात पेपर पहिला हा सामान्यज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र आदी विषयांवर आधारित प्रश्नांचा असतो, तर दुसरा पेपर उताऱ्यावरील प्रश्न, निर्णयक्षमता आदींवर आधारित असतो. या दोन्ही प्रश्नपत्रिकांत भाजपधार्जिणे प्रश्न विचारण्यात आले आहेत, तर काँग्रेसच्या चुकांवर बोट दाखवणारा उतारा देण्यात आला आहे.

पेपर दोनमधील दोन आक्षेपार्ह उतारे
-राज्य सेवेच्या २१ मार्च रोजीच्या पूर्वपरीक्षेतील पेपर दुसरामध्ये पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. याअंतर्गत पीएम किसान योजनेतील अडथळे या मथळ्याखाली दिलेल्या उताऱ्याची सुरुवात - ‘मोदी शासनाने शेतकऱ्यांसाठी रोख रक्कम ही योजना सुरू केली आहे.’ वास्तविक यात केंद्र सरकार किंवा भारत सरकार असा उल्लेख हवा होता.
-पेपर दोनमध्ये आणखी एक उतारा देण्यात आला असून त्यात काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली असा आशय वापरण्यात आला आहे. या प्रश्नरूपी उताऱ्यातील त्या ओळी अशा - ‘ब्रिटिश सत्तेच्या काळात काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे होते की, राजकीय शिक्षण हे शिक्षणाचे महत्त्वाचे अंग आहे. शिक्षण आणि राजकारण यांचे मिश्रण करू नये, या ब्रिटिश दृष्टिकोनास स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. परंतु १९४७ मध्ये जेव्हा काँग्रेस नेते सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी ब्रिटिश धोरणाचा मात्र स्वीकार केला आणि म्हणू लागले की, राजकारणाद्वारे शिक्षणाला अशुद्ध करू नये.’

पेपर एकमध्ये जनधन योजना, उज्ज्वला योजना
राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर एकमध्येही केंद्रातील भाजप सरकारने चालवलेल्या अनेक योजनांचा उल्लेख असणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यात संसद आदर्श ग्राम योजनेबाबत कोणते विधान बरोबर आहे? प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे कोणती ? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर विमुद्रीकरण, नवा बेनामी कायदा, दिवाळखोरी कायदा आणि आधार कायदा या आर्थिक सुधारणा जोड्या लावामध्ये विचारण्यात आल्या आहेत.

काँग्रेस असे प्रकार खपवून घेणार नाही
काँग्रेस असे प्रकार खपवून घेणार नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. देशातील सरकारचा उल्लेख भारत सरकार असाच झाला पाहिजे. अशा चुका करणाऱ्या नोकरशाहीला महाविकास आघाडीने वठणीवर आणावे. - अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...