आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली घटली:राजकीय दबाव अन् कर्जबुडव्यांमुळे मुद्रा लोनचा एनपीए 17 टक्क्यांवर, थकीत खात्याची रक्कम पोहोचली 157 कोटी रुपयांवर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनच्या वाटपात वाढ होत असली तरी कर्ज बुडवणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत एनपीए वाढला असून थकीत रक्कम तब्बल १५७ कोटींवर पोहोचली आहे. एनपीएचे प्रमाण मार्च २०२१ मध्ये १७ टक्के होते. या वर्षी ते २० टक्क्यांपेक्षा अधिक होवू शकते.

केंद्र सरकारने लहान व्यावसायिकांसाठी मुद्रा लोन ही योजना सुरू केली असून सरकारी बँकांच्या माध्यमातून विनातारण कर्ज दिले जाते. त्यासाठी ७ ते ९ टक्के इतका व्याजदर आकारला जातो. कर्ज घेणाऱ्यांना कोटेशन, परवाना, आधार कार्ड, फोटो, व्यवसायासंबधीची माहिती द्यावी लागते. शिशू, किशोर आणि तरुण या तीन विभागांतर्गत कर्जपुरवठा केला जातो. शिशुअंतर्गत ५० हजार, किशोरमध्ये ५० हजार ते पाच लाख, तर तरुणअंतर्गत दहा लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

कोरोना, लॉकडाऊनमुळे लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
११०१ कोटी रुपयांचे वाटप : अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिगंबर महाडिक यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात या वर्षी मुद्रा लोनअंतर्गत ११०१ कोटींचे वाटप झाले आहे.

गेल्या वर्षीही १७ टक्के रक्कम होती थकीत
गेल्या वर्षी १ लाख ४२ हजार ३९४ जणांना ९३९ कोटींचे कर्जवाटप झाले. त्यात १५,९४७ जणांचे (१७ टक्के) खाते एनपीए झाले. थकीत खात्याची रक्कम १५७ कोटी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासूनची स्थिती पाहिल्यास मुद्रा लोनमध्ये एनपीए सातत्याने वाढत आहे.

बँक युनियनने केली होती पोलिसांत तक्रार
सर्वच राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना कर्ज मिळावे यासाठी आग्रह करतात. त्यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलन केले जाते. कोरोनाच्या आधी तर राजकीय दबावाच्या विरोधात बँक युनियनच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.

छोट्या व्यावसायिकांच्या एनपीएत मोठी वाढ
बहुतांश लहान व्यावसायिक कर्जाची परतफेड करत नाहीत. कोरोनाकाळात एनपीए अधिक वाढला. गेल्या वर्षी एनपीए १७ टक्के होता. डिसेंबर अखेर १६ टक्के एनपीए असून मार्च, एप्रिलमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. त्याचाही परिणाम झाला. - दिगंबर महाडिक, व्यवस्थापक अग्रणी बँक

कोरोनामुळे मोडले कंबरडे
कोरोनात छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम मुद्रा लोनचे एनपीए वाढण्यात झाला आहे. राज्यात सर्वच ठिकाणी परतफेडीत अडचणी निर्माण झाल्या. राज्यात इतर ठिकाणापेक्षा औरंगाबादमध्ये राजकीय दबाव अधिक आहे. त्याचा परिणाम कर्ज परतफेडीवर होतो. - देविदास तुळजापूकर, बँकिंग अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...