आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतीपूरक व्यवसाय तुती रेशीम पिकाला महाराष्ट्र सरकारने कृषी पीक म्हणून मान्यता दिली आहे. या आशयाचा जीआर सोमवारी कृषी व पशुसंवर्धन विभागाने काढला. तुती रेशीमला कृषी पिकाचा दर्जा मिळाल्यामुळे रेशीम शेती करणाऱ्यांना आता कृषी क्षेत्रासाठी लागू सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांत तुती रेशीमची शेती केली जाते. या सर्व शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यात तुती व टसर (वन्य) अशा २ प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. सहकार व पणन विभागाकडून कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील तरतुदीनुसार तुतीचा शेती उपजाच्या अनुसूचित समावेश करण्यास मान्यता मिळाली.
नियोजन विभागाने तुतीला वृक्षाचा दर्जा दिला आहे. कृषी विद्यापीठांत रेशीम किडे शास्त्राचा समावेश असून हा विषय व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून शिकवला जात आहे. तुती रेशीम हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून समोर येत आहे. तुती लागवड शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र तुती लागवड व रेशीम उद्योगाचा समावेश वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे शेतीच्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता. तुती रेशीमचा समावेश कृषी पिकांत झाल्याने हे सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना फायदेशीर
कृषी पिकांत तुती रेशीमचा समावेश करण्याची मागणी सोलापूर सिल्क असोसिएशन व रेशीम उत्पादकांनी तत्कालीन सहकार-वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे केली होती. आता मान्यता मिळाल्याने तुती लागवड करणाऱ्यास बँकांकडून कर्ज, पीक विमा संरक्षण, योजनानिहाय अनुदान, नैसर्गिक आपत्तीत भरपाई व कृषी योजनांच्या लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे. - डाॅ. संतोष थिटे, सदस्य, रेशीम सल्लागार समिती, महाराष्ट्र.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.