आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओत छापा:मुंबईच्या एसीबीची धडक कारवाई;एआरटीओसह एक एजंट ताब्यात; ड्रायव्हिंग स्कूलचालकाने केलेल्या तक्रारीनंतर पथकाने पकडले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैशाची मागणी : महत्त्वाची कागदपत्रे, स्टॅम्प जप्त; घराची झडती

मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयात छापा मारून सोमवारी (१२ जुलै) दुपारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने व त्याचा खासगी सहकारी (एजंट) अभिजित पवार या दोघांना ताब्यात घेतले. शहरातील बजरंग चौक येथील एका ड्रायव्हिंग स्कूलचालकाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

हनुमाननगर, गारखेडा येथील ड्रायव्हिंग स्कूलचालकाने मुंबईच्या लाचलूचपत विभागाकडे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी माने व त्याचा खासगी सहकारी अभिजित पवार यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. परवाना नूतनीकरणासाठी १८ हजारांची मागणी हे दोघे करत आहेत. त्यापैकी काही रक्कम दिली असून उर्वरित रकमेसाठी ते धोशा लावत असल्याचे ड्रायव्हिंग स्कूलचालकाचे म्हणणे होते. या आधारे सोमवारी सकाळी ११.३० वाजता आरटीओ कार्यालयात मुंबईचे पथक दाखल झाले. पथकाने पवारच्या गाडीतून काही महत्त्वाची कागदपत्रे व स्टॅम्प जप्त केले असून मानेच्या घराचीही झडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वेदांतनगर पोलिसांशी संपर्क साधला असता जाबजबाब घेण्याचे काम सुरू असून संपूर्ण माहिती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिसाद नाही म्हणून थेट मुंबईला तक्रार?
औरंगाबादेतही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. या ड्रायव्हिंग स्कूलचालकाने आधी औरंगाबादेत तक्रारी केल्या. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने थेट मुंबईत तक्रार केल्याची चर्चा आरटीओ वर्तुळात होती.

उचलून पटकत नेऊ... धिंड काढू.. असा इशारा पथकाने देताच तो म्हणाला, ओके साहेब. चला
लाचखोरीच्या प्रकरणात कुणी सरकारी अधिकारी किंवा त्याचा ‘कॅशी’ एजंट पकडला गेला तर त्याच्या पाचावर धारण बसते. आपण या प्रकरणात नाही, अशी गयावया तो करू लागतो. आपला संबंध नसल्याचे पुरावे देण्याचा प्रयत्न करतो. काही जण तर पळून जाण्याची धडपड करतात. परंतु आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांना वेगळाच अनुभव आला. अभिजित पवार नावाच्या एजंटला अधिकाऱ्यांनी ‘जास्त नाटक करशील तर उचलून पटकत नेऊ... धिंड काढू’ असा इशारा दिला. आपला ‘कार्यक्रम’ लागला हे लक्षात येताच तो ‘ओके साहेब, चला’ असे म्हणत पथकासोबत निघाला.

पोलिसच बनला डमी ग्राहक
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाचलुचपतच्या पथकातील एक कर्मचारी ड्रायव्हिंग स्कूलचा ग्राहक म्हणून आरटीओ अधिकाऱ्याकडे गेला. पथकातील ११ जण त्याच्या आसपास फिरत होते. लाचखोर अधिकाऱ्याचा “खास’ माणूस म्हणून प्रख्यात असलेल्या अभिजितने पाचशेची नोट डमी ग्राहकाकडून घेताच पथकाने अक्षरश: काही सेकंदांत वेढा घालत त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई एवढ्या वेगात झाली की, लाचलुचपतचा छापा पडल्याचे कोणाच्या लक्षातही आले नाही, असे स्थानिक ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. ते म्हणाले, की ड्राइव्ह टेस्टच्या ट्रॅकवर सुमारे १०० ते १५० जण होते. त्यांच्या साक्षीने हा प्रकार घडला.

दररोज तीन लाखांचा व्यवहार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ सांगली येथील रहिवासी, राज्यातील एका सत्ताधारी पक्षाशी जवळीक असलेले माने (वय ३२) यांची औरंगाबादेत पहिलीच पोस्टिंग होती. त्यांच्याकडे वाहनचालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल परवाने, नूतनीकरण आदी कामे २०१८ पासून सोपवलेली आहेत. जप्तीच्या गाड्या दंड लावून सोडण्याचाही अधिकार त्यांच्याकडे होता. माने आणि त्यांचे हस्तक (एजंट) दररोज किमान तीन लाखांचा व्यवहार करत होते, अशीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...