आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचपणी:गो-फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे संधी, छत्रपती संभाजीनगरहून पुणे, अहमदाबादसह मुंबई-दिल्ली सायंकाळचे उड्डाण शक्य

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गो-फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. देशातील विमान सेवेत सर्वाधिक हिस्सा असलेल्या इंडिगो, एअर इंडिया आदी कंपन्या छत्रपती संभाजीनगरहून दिल्ली, मुंबईसाठी सायंकाळची सेवा सुरू करू शकतात.

पुणे येथून गो एअरची सेवा बंद झाल्याने विमानसेवा शक्य आहे. चिकलठाणा विमानतळावर रात्रीची पार्किंग मोफत असून इंधनावर इतर शहरांच्या तुलनेत अत्यल्प कर आकारणी केली जाते. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने यासंबंधी पुढाकार घेत नवी दिल्ली येथील विमानसेवा देणाऱ्या प्रमुख कंपन्यांशी संपर्क करण्यात आला आहे.

कोविडकाळात बंद झालेल्या प्रवासी रेल्वेगाड्या अद्याप पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. ३० एप्रिल या एका दिवशी देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाख ५६ हजार होती. देशांतर्गत विमानसेवेत ७ टक्के हिस्सा असलेले गो-फर्स्ट दिवाळखोरीत निघले. देशातील इतर कंपन्यांत इंडिगो ५३.७ टक्के, एअर इंडिया १०.५ टक्के, स्पाइस जेट १०.३ टक्के, विस्तरा ९.२ टक्के, एअर एशिया ६.३ टक्के आदींना आता इतर कंपन्यांच्या सुटलेल्या मार्गावर सेवा देण्याची संधी आहे.

इंडिगो, एअर इंडियाकडे पाठपुरावा

चिकलठाणा विमानतळावर रात्री बारा ते सूर्योदय होण्यापूर्वी थांबलेल्या विमानांना पार्किंग शुल्क आकारण्यात येत नाही. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबादसारख्या शहरातील विमानतळावर शुल्क आकारले जाते. शिवाय चिकलठाणा विमानतळावर ऑइल, पेट्रोल भरल्यास त्यावर केवळ ५ टक्के कर (जीएसटी) लागतो. देशातील इतर शहरांमध्ये हाच कर २५, ३३ आणि २८ टक्के आहे.

पार्किंग सुविधा आणि इंधनाच्या सवलतीचा लाभ विमान कंपन्यांनी घ्यावा यासाठी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन प्रयत्नशील आहे. याबाबत इंडिगो, एअर इंडिया आणि इतर कंपन्यांकडे पाठपुरावा केला आहे.

पुणे विमान सेवेसाठी मिळेल परवानगी
पुण्याहून गो एअर कंपनीची सेवा बंद झाल्याने येथील वेळापत्रक रिक्त आहे. येथून विमान कंपनीला उड्डाणासाठी अर्ज करण्याची आवश्यकता आहे. इंडिगोसारख्या मोठ्या कंपनीने अर्ज केल्यास त्यांना तत्काळ परवानगी मिळेल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे येथे प्रवाशांची मोठी गर्दी आहे. रेल्वेसेवा अडचणीची असताना तीदेखील फुल्ल आहे. नियमित जाणारी खासगी ट्रॅव्हल्स सेवा आणि राज्य परिवहन मंडळाची बससेवा अपुरी पडत आहे. पाच तासांचा रस्ते मार्गाचा कालावधी असताना ट्रॅफिक जाममुळे प्रत्यक्षात सात ते नऊ तास लागतात. त्यामुळे या मार्गावर हवाई प्रवास साेयीचा ठरू शकताे.

सेवा पूर्ववत करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरहून अहमदाबादसाठी आठवड्यातून तीन दिवस सेवा यापूर्वी होती. बंगळुरूची सेवा पूर्ववत केल्यानंतर आता अहमदाबाद सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. इंदूरसाठी शहरातून सेवा देणे आता कंपन्यांना शक्य आहे. शिवाय मुंबई आणि दिल्लीसाठी सायंकाळची सेवा सुरू करण्यासोबत उदयपूर, जयपूरचा पर्याय विविध विमान कंपन्यांनी दिला आहे. कंपन्यांशी तशी बोलणी सुरू आहेत.

- सुनीत कोठारी, चेअरमन, सिव्हिल एव्हिएशन कमिटी