आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई उपनगर संघाने 49 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुले व मुलींच्या दोन्ही गटात शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळविला. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी संघटना व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गंगाखेड-परभणी येथील स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत पुणे संघाला 35-33 गुणांनी पराभूत करत "क्रीडा शिक्षक स्व. चंदन सखाराम पांडे चषकावर’ आपले नाव कोरले. कुमार गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने अहमदनगरला रोमहर्षक लढतीत 24-23 ने हरवत "स्व. प्रभाकर नागो पाटील चषक’ जिंकला. 2002 साली उपनगरने ही किमया केली होती. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा योग जुळून आला.
कुमार गटाच्या लढतीत अहमदनगरच्या मुलांनी आक्रमक सुरुवात करत सलग 4 गुण घेतले. 4 मिनिटानंतर व 4 गुणानंतर उपनगरने पहिला गुण घेत आपले खाते उघडले. त्यानंतर मात्र सामन्यात चुरस पहावयास मिळाली. अहमदनगरने सुरुवाती पासून सामन्यावर वर्चस्व राखत मध्यांतराला 11-08 अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर देखील 7-8 मिनिटे नगरकडे आघाडी होती. त्यानंतर मात्र उपनगरने जोरदार मुसंडी मारली. हळूहळू गुण घेत उपनगरने आघाडी कमी करत आणली. शेवटी रजतसिंग यांने शिलकी 2 गडी टिपत अहमदनगर वर लोण देत 15-12 अशी आघाडी घेतली. शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना 22-17 अशी उपनगरकडे आघाडी होती. शेवटी उपनगरने एका गुणाने बाजी मारली. अहमदनगरच्या शिवम पठारे, सौरभ मैडे यांचा चौफेर खेळ शेवटच्या काही मिनिटात ढासळला. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उपनगरने पुण्याला हरवले
मुलींच्या अटीतटीच्या लढतीत मुंबई उपनगरने पुण्यावर 28-25 गुणांनी मात करत जेतेपद मिळवले. एक वेळ दोन्ही संघ 23-23 असे बरोबरी होते. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 26-25 अशी उपनगरकडे आघाडी होती. पण संयमाने खेळ करीत उपनगरने 2 गुणाने बाजी मारली. हरजित संधू हिच्या धूर्त व संयमी चढाया तिला याशिका पुजारी व स्नेहल चिंदरकरची मिळालेली चढाई-पकडीची महत्वपूर्ण साथ यामुळे हा विजय शक्य झाला.
थाटात बक्षीस वितरण
या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे व स्थानिक आमदार, आयोजक डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने या स्पर्धेत प्रथमच जिल्हा संघांना "रिव्ह्यू" घेण्याची संधी "स्पोर्ट्स-वोट" च्या सहकार्याने प्रायोजिक तत्वावर उपलब्ध करून दिली. ही जबाबदारी मुंबईच्या शशिकांत राऊत व जळगावच्या संजय विचारे यांनी यथाशक्ती पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.