आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीचे राजकारण:दोन लाख लोकांचे पाणी चोरणाऱ्यांना मनपा प्रशासक १५ दिवसांत शोधणार, अधिकाऱ्यांवर नाव न घेता आरोप

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको-हडकोतील दोन लाख नागरिकांच्या हक्काचे १८ ते २३ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी दररोज कोण चोरते, याचा शोध मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय १५ दिवसांत घेणार आहेत. याप्रश्नी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळाला मंगळवारी (५ एप्रिल) त्यांनी तसे आश्वासन दिले. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाणी चोरांचा शोध लागेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणेसाठी त्यांनी नऊकलमी कार्यक्रमही जाहीर केला.

सिडको-हडकोतील नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. त्यातही ड्रेनेजमिश्रित घाण पाणी येत असल्याने आरोग्य बिघडले आहे. त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी भाजपच्या वतीने सिडको एन- ५ जलकुंभ आणि मनपा प्रशासकांच्या बंगल्यासमोर लक्षवेधी आक्रोश आंदोलन करण्यात आले. या विषयावर विस्तृत चर्चेसाठी मंगळवारी पांडेय यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. त्यात सावे म्हणाले की, नक्षत्रवाडीवरून शिवाजीनगर, हनुमाननगर आणि सिडको एन-५, एन-७, हडकोतील नागरिकांसाठी ५३ एमएलडी पाणी सोडले जाते. त्यापैकी फक्त ३० ते ३५ एमएलडी जलकुंभात पोहोचते. हे १८ ते २३ एमएलडी पाणी कुठे मुरते? अशी चोरी होत असल्यानेच ४ दिवसांऐवजी ८ ते ९ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातोय का? यात जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी. ती पांडेय यांनी मान्य केली.

दीड तास चाललेल्या बैठकीला माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, जयश्री किवळेकर, नितीन चित्ते, राजगौरव वानखेडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. नक्षत्रवाडीतून किती पाणी सोडले जाते, असा प्रश्न सावे, प्रशासकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर ५३ एमएलडी असे उत्तर मिळाले. प्रत्यक्षात सिडकोतील जलकुंभात ३० ते ३५ एमएलडी येत असल्याचेही सांगितले. अधिकाऱ्यांनीच पुरवठ्यात मोठी तूट असल्याचे कबूल केल्यावर सावे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अनियमित, कमी दाबाने होणारा पुरवठा सुरळीत करावा, असेही ते म्हणाले. त्यावर या प्रकरणात क्लिष्ट तांत्रिक बाबी आहेत. शिवाय सुधारणाही अपेक्षित आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा अवधी द्यावा, असे पांडेय यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पाणीपुरवठ्याचे बिघडलेलेे वेळापत्रक आणि नियोजन तसेच गळती (चोरी) ही आमची चूक असल्याचे त्यांनी मान्य केले.

अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
जलकुंभात येणाऱ्या पाण्याची नोंद घेण्यासाठीचे मीटर सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे म्हणाले. तर मीटर बंद असल्याचे उपअभियंता अशोक पद्मे यांनी सांगितले. मीटर बंद असल्याची कागदोपत्री नोंद आहे का, या पांडेय यांच्या प्रश्नावर पद्मे निरूत्तर झाले.

येथे मोठी चोरी, गळती
मनपा प्रशासकांनी चोरी शोधण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. एवढा वेळ गरजेचा आहे का? चोरी कुठे होते, याची माहिती तुम्हाला कशी नाही, असा प्रश्न माजी नगरसेवकांनी विचारला असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, सिडको एन-५ येथील जलकुंभातून टँकरद्वारे अनेक हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व्यावसायिक आणि काही धनिकांना पाणी विक्री केले जाते. शिवाय नक्षत्रवाडी ते सिडको एन-५ पर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे. काही हजार अवैध नळजोडण्या आहेत. अनेक वेळा पैसे घेऊन तर काही वेळा राजकीय दबावातून टँकर पाठवले जातात. त्यामुळे प्रशासकांनी याच दिशेने शोधल्यास दोन-तीन दिवसांत चोर सापडतील. मात्र, पुरवठ्यात सुधारणा आणि तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी त्यांना दोन आठवडे लागू शकतात, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

पाणीपट्टी ६१० रुपये करण्यासाठी तुम्हीही राज्य शासनाला कळवा
महापालिका वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी ४०५० रुपये पाणीपट्टी घेते. प्रत्यक्षात ५५ दिवसच पुरवठा करते. त्यामुळे या ५५ दिवसांची ६१० रुपयेच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी वारंवार मांडली. त्यावर प्रशासक पांडेय ठोस भूमिका घेत नसल्याचे लक्षात आल्यावर ‘तुम्ही औरंगाबादकरांच्या वतीने राज्य शासनाला कळवा. पाणीपट्टी ६१० रुपयेच असावी, असा आग्रह धरा’ अशी सूचना आमदार सावेंनी प्रशासकांना केली.

प्रशासकांचा नऊकलमी कार्यक्रम
१. जलकुंभावर सीसीटीव्ही कॅमेरे २. टँकरवर जीपीएस ३. मीटर दुरुस्ती ४. नक्षत्रवाडी ते एन-५ जलवाहिनीवर दोन अधिकाऱ्यांची निगराणी ५. गळती, चोरी शोधणार ६. पाणी वितरणाची नोंदवही ठेवणार ७. दोषी अधिकाऱ्यांची उलचबांगडी अथवा कारवाई ८. वेळापत्रकात सुधारणा ९. ड्रेनेज दुरुस्ती.

बातम्या आणखी आहेत...