आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:‘घरकुल’ घोटाळा उघड करणाऱ्या प्रशासकाची बदली, छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तपदी चौधरींच्या जागी जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे बदलीसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न
  • घरकुल योजनेच्या निविदेतील घोटाळ्याच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे
  • आयुक्त, प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांची नऊ महिन्यांतच बदली झाली आहे.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी महापालिकेच्या आयुक्तपदी, तर डाॅ. चौधरी यांची ‘जीएसटी’च्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या आग्रहानंतर अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेतून डॉ. चौधरी यांच्या बदली आदेशावर मंगळवारी (2 मे) शिक्कामोर्तब करत बदलीचे आदेश जारी केले.

डॉ. चौधरी यांची 22 जुलै 2022 रोजी छत्रपती संभाजीनगर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. पदभार हाती घेताच त्यांनी येथील प्रत्येक विकासकामाचा बारकाईने अभ्यास सुरू केला. त्यांनी स्मार्ट सिटीतील 317 कोटी रुपयांच्या रस्तेकामांत लक्ष घातले. स्मार्ट सिटीकडे निधीच शिल्लक नसल्याने त्यांनी रस्त्यांची कामे थांबवली होती. आता या रस्ते कामांसाठी ‘स्मार्ट सिटी बस’ची मुदत ठेव (एफडी) तोडून 66 रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल प्रकल्पांतील अनियमितताही डॉ. चौधरी यांच्यामुळेच उघडकीस आली. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे महापालिकेतील संचिकांचा प्रवास मंदावल्याची ओरड अधिकारी वर्गातून केली जात होती. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक राजकारण्यांची व त्यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची कामे रोखली गेल्याने डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी विशेष प्रयत्न सुरू होते. अखेर डॉ. चौधरी हे विदेश दौऱ्यावर असताना मंत्रालयातून मंगळवारी बदली आदेश जारी करण्यात आले.

डाॅ. चौधरी प्रशासकीय परीक्षेत पास, राजकीय तडजोडीत नापास-मंदार जोशी

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. अभिजित चौधरी यांची सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपण्याअगोदरच बदली झाली. प्रशासनाने घेतलेल्या अचानक या निर्णयामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. ‘जी 20’सह अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. चौधरी प्रशासकीय आणि नागरिकांच्या परीक्षेत पास झाले. मात्र राजकीय स्पर्धेत नापास झाल्यामुळे अवघ्या नऊ महिन्यांत त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या चौधरी यांनी छत्रपती संभाजीनगर मनपाची सूत्रे हाती घेतली. नंतर पूर्वीच्या आयुक्तांनी घेतलेल्या अनेक कामांचा त्यांनी पुनर्विचार केला. अनेक कामांना स्थगिती दिली. दोन महिन्यांपूर्वी अचानक घरकुल योजनेला हात घालत निविदा प्रक्रियेतच कशा प्रकारे घोटाळा झाल्याचे हे बाहेर काढत थेट फौजदारी गुन्हे दाखल केले.

भाजपच्या दोन मंत्र्यांच्या वादात अडकलेल्या चौधरी यांच्या‎ बदलीची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली. मात्र, थेट भाजप‎ पक्षश्रेष्ठींनी यात हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. मात्र, तोपर्यंत‎ ‘ईडी’चा ससेमिरा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मागे लागला‎ होता. त्यामुळे आता बळी कुणाचा द्यायचा ही चर्चा सुरू‎ असतानाच हे प्रकरण बाहेर काढणाऱ्याची बदली झाली, तर हे‎ सगळे शांत होईल. यासाठी ही बदली केली असावी, अशी चर्चा‎ आहे.‎

डॉक्टरांचे स्मार्ट सिटीचे ऑपरेशन अपूर्ण

ज्याप्रमाणे डॉ.‎ अभिजित चौधरी यांनी घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेतील‎ घोटाळा बाहेर काढला, त्याचप्रमाणे त्यांनी स्मार्ट सिटीची‎ शस्त्रक्रियादेखील हाती घेतली होती. त्याचाच पहिला भाग म्हणून‎ 317 कोटींच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देत रस्त्यांची‎ संख्या कमी करून त्याच कंत्राटदाराकडून हे काम पूर्ण करून‎ घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. वेळ पडली तर कंत्राटदारावर‎ कारवाईचा बडगादेखील उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.‎ भाजप नेत्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गॅस लाइनच्या‎ कंत्राटदारालाही चौधरी यांनी त्यांच्यासमोरच झापले. त्यामुळे‎ ‘डीसीएम’ कार्यालय पाठीशी असतानाही अखेर बदलीचा डाव‎ खेळलाच गेला. आणि चौधरी कुटुंबीयांसह सुटीवर असताना हा‎ आदेश काढण्यात आला.‎

डाॅक्टरांचे ‘जालीम’ औषध नकोसे

‘जी-20’मध्ये महत्त्वाचे‎ काम करणारे चौधरी यांना पुढच्या महिन्यात टुरिझम परिषदेचे‎ काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक‎ नेत्यांच्या निधी सढळ हाताने वापरताना मनपाची मोजपट्टी लागत‎ होती. शिवाय मनपाच्या पारंपरिक कार्यशैलीत डाॅ. चौधरी यांचे‎ नवे ‘उपचार’ अनेकांना ‘कडू’ औषधासारखे वाटले. म्हणून‎ ‘आजार’ चालेल ‘जालीम’ उपाय नको, असे म्हणत मनपातूनही‎ राजकीय नेत्यांना रसद पुरवली गेल्याची चर्चा आहे.‎

पाणीपुरवठा, खड्डेमय रस्त्यांचे नवीन आयुक्तांपुढे आव्हान-संतोष देशमुख

महापालिकेचे नवे प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासमोरही घरकुलांचे वाटप, खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले वेळापत्रक, नवीन पाणी योजनेचे काम, आरोग्य सेवा, शहर स्वच्छता ही आव्हाने आहेत.शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक वारंवार कोलमडत आहे. यामध्ये सुधारणा करण्याचा डॉ. चौधरी यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. त्याकडे नव्या आयुक्तांना लक्ष द्यावे लागणार आहे. पाणी योजनेचे काम गतीने करण्याचेही त्यांच्यासमोर आव्हान आहे.

त्याशिवाय सफारी पार्क, नवीन प्राणी संग्रहालय आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या आयुक्तांपुढे आहे.मनपा निवडणुकीचेही आव्हान : गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झाली नाही. शहरवासीयांच्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. निवडणुकांकडे राजकीय पदाधिकारी व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नव्या आयुक्तांच्या कार्यकाळात निवडणूक होऊ शकते. त्यांच्यासमोर ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे.मनपा सभागृहाची मुदत संपल्यानंतर तिसरे प्रशासक

जी. श्रीकांत यांना महापालिकेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न

जी. श्रीकांत यांना मनपाच्या आयुक्तपदी आणण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुुरू होते. जी. श्रीकांत यांना देखील आयुक्तपदी येण्याची इच्छा होती. आगामी काळात पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विकास कामे करून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न असेल. मात्र, डॉ. चौधरी यात अडचणीचे ठरत असल्याने राजकारण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावून जी. श्रीकांत यांना मनपात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.