आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबक्या आवाजात चर्चा:मनपा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरींच्या बदलीची चर्चा

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून निर्णय घेण्याची शैली असणारे प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्या बदलीची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यांच्या जागी जीएसटी कमिशनर जी. श्रीकांत येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रशासक डॉ. चौधरी यांना विचारले असता, ‘मला काहीही माहिती नाही. मात्र मी बदलीचा अर्ज केलेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यात रिंग करणाऱ्या ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर या चर्चेला अधिक वेग आला आहे. चौधरी यांनी मनपा आणि स्मार्ट सिटीचा पदभार घेताच अनेक जुन्या निर्णयांना स्थगिती दिली. त्यामुळे ठेकेदार लॉबी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र मनपा आणि राजकारणातील एक गटालाही हा निर्णय पटला नसल्याचे बोलले जाते आहे. तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या बदलीनंतर डॉ. चौधरी यांनी ही जबाबदारी घेतली. त्यांनी पांडेय यांच्या कार्यकाळातील घरकुल योजना, स्मार्ट सिटीतील रस्त्यांच्या कामांना स्थगिती दिली. या योजनेतील लाभार्थींचा डेटा नसल्याचे, निविदा प्रकरणात घोटाळा झाल्याचे तसेच राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा अहवालही ईडीने जागवल्याचे पुढे आले आहे.

मनपा-जिल्हाधिकारी कार्यालयात शीतयुद्ध घरकुल योजनेच्या सुरुवातीपासून ही योजना कुणी करायची, यावरून मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात शीतयुद्ध सुरू आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त दोन्ही बदलले. मात्र अजूनही हे शीतयुद्ध सुरूच आहे. विशेष म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे पूर्वी मनपाचे आयुक्त होते. त्यांच्या अनेक निर्णयांना डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थगिती दिली. छत्रपती संभाजीनगर मनपाचा कार्यभार हातात घेऊन त्यांना सहा महिने झाले. नियमानुसार त्यांच्या बदलीला दीड वर्ष वेळ आहे. तरीही त्यांच्या बदलीची चर्चा का सुरू झाली, यामागे कोण आहे हे स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...