आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नियोेजितजागेवर पालिकेने उभारला कचरा डेपो; पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनपाने पाच कोटींचे अंदाजपत्रक तयार केले, निधीअभावी काम रखडले, आता लागणार १४ कोटी

सिडको एन-७ परिसरातील वाॅर्ड क्रमांक ३२ आंबेडकरनगर येथील एमआयडीसीच्या जागेवर सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर पालिकेने पात कोटींचे अंदाजपत्रकही तयार केले. मात्र, निधी न मिळाल्याने हे काम रखडले आहे. तथापि, स्मार्ट सिटी हेल्थ योजनेतूनही मनपाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आता हे बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी १४ कोटी रुपये लागणार आहेत. हाॅस्पिटलचे बांधकाम कधी होईल, असा प्रश्न सिडको-हडकोसह आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ विचारत आहेत. यामुळे सध्या या मोकळ्या जागेवर पालिकेच्या घनकचरा विभागाचा कचरा डेपो तयार करण्यात आला आहे.

वाॅर्ड क्रमांक ३२ च्या माजी नगरसेविका भारती महेंद्र सोनवणे यांनी आंबेडकरनगरातील स्मशानभूमीला लागून एमआयडीसीच्या जागेवर ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल बांधण्याची मागणी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली होती. त्यानंतर सोनवणे यांनी ही जागा एमआयडीसीची असल्याने ती मनपाच्या नावे करण्यासाठीही पाठपुरावा केला. अखेर ७ मे २०१७ रोजी पर्यावरण तथा औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या आदेशाने ही जागा एमआयडीसीने हाॅस्पिटलच्या बांधकामासाठी पालिकेकडे हस्तांतरीत केली. जागा मनपाच्या ताब्यात आल्यावर तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांकडे सुरक्षाभिंत, पेव्हर ब्लाॅक, ड्रेनेजलाइन व जलवाहिनीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाख रुपये मंजूर करून सर्व कामेही करून घेतली.

आता १४ कोटी अपेक्षित
हाॅस्पिटलच्या इमारतीसाठी २०१७ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून ७ कोटी निधी मंजूर होईल अशी मनपाला अपेक्षा होती. मात्र, पाच वर्षांनंतरही यश आले नाही. परिणामी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. त्यामुळे हाॅस्पिटलसाठी नियोजित जागा आणि त्यावर ५० लाख रुपये खर्च करून झालेल्या विकासकामांवर धूळ साचली. आता तेथे बांधकाम करावयाचे झाल्यास सद्य:स्थितीतील डीएसआर रेटनुसार किमान १४ कोटी रुपये अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

राज्य सरकारने निधी द्यावा
करोनाच्या संकटातही जागेचा कचरा झाला. एकीकडे कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसताना सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या बांधकामासाठी फडणवीस सरकारच्या दुर्लक्षावरून संताप वाढतो. दुसरीकडे क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रोडवर अपघाताला आमंत्रण देणाऱ्या सायकल ट्रॅकसाठी तीन कोटी रुपये वायफळ खर्च केला जात आहे. राज्य सरकारने आता तरी निधी उपलब्ध करून द्यावा. - भारती सोनवणे, माजी नगरसेविका

मोठा आधार मिळाला असता
या रुग्णालयामुळे शहरासह ग्रामीण भागासाठीही मोठा आधार मिळाला असता. १५ दिवसांत या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मनपाने जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. यासंदर्भात मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतो. लवकरात लवकर यासाठी निधी प्राप्त करून नियोजित जागेवर सुसज्ज हॉस्पिटलचे बांधकाम होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. - चंद्रकांत खैरे, माजी खासदार

या सुविधा मिळतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पाचा एकूण खर्च ७ कोटी आकारण्यात आला आहे. यात ५० खाटांचे नियोजन केले आहे. हाॅस्पिटलमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, इको-कार्डिओग्रॅम, २डी इको, कलर डॉप्लर, थ्रीडी सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, न्यूरो सर्जरी, न्यूरोलॉजी, कॉर्डिओलॉजी, कार्डिओ सोरेसिस सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आदी सुविधा असतील.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
दरम्यान, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी २ जानेवारी २०१९ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. त्यानंतर डाॅ. दीपक कुलकर्णी यांनी २० आॅगस्ट २०१९ रोजी शहराचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांसह राज्यमंत्री अतुल सावे यांनादेखील निधी उपलब्धतेसाठी पत्र पाठवले. मात्र, त्यांनीही पत्राला उत्तर दिले नाही. तेव्हापासून पालकमंत्र्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.

माजी महापौरांचे प्रयत्न निष्फळ
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनीकुमार यांना २० जुलै २०१८ रोजी एका पत्राद्वारे निधीची मागणी केली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत प्रस्ताव दाखल करा, असे कळवल्यावर घोडेले यांनी २० आॅगस्ट २०१८ रोजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्याकडे रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा नकाशा व अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव पाठवला. मात्र, त्यांनीही दाद दिली नाही.

निधीसाठी अडले घोडे
हाॅस्पिटलच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मनपाने तयार केले. मात्र, मनपाकडे पुरेसा निधी नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याबाबत शहराच्या माजी पालकमंत्र्यांच्या ७ मे २०१७ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत २९ मे २०१७ रोजी तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या २० जानेवारी २०१८ च्या आदेशाने पुन्हा तत्कालीन मनपा आयुक्त मुगळीकर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना २ फेब्रुवारी २०१८ रोजी किमान ४ कोटी ३० लाख रुपये तरी मंजूर करा, असे पत्र पाठवले. मात्र, ना मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली ना नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी.

बातम्या आणखी आहेत...