आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:संचारबंदी शिथील झाल्याने पालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम, नागरीकांसह शहराचाही श्वास मोकळा

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिस मदत केंद्रही उचलून पालिकेच्या वाहनात

हिंगोली शहरात संचारबंदीचे नियम शिथील झाल्यानंतर नागरीकांनी घराबाहेर पडून मोकळा श्‍वास घेतला, त्या पाठोपाठ सोमवारी (ता. १) पालिकेने शहरातील अतिक्रमण हटविल्यामुळे शहरानेही मोकळा श्‍वास घेतला आहे. यामध्ये महात्मा गांधी चौका जवळ असलेली पोलिस विभागाची चौकीही पालिकेने काढून टाकली.

हिंगोली शहरात संचारबंदीमध्ये अनेक जण मागील सुमारे अडीच महिन्यापासून घरातच अडकून पडले होते. प्रशासनाकडून संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिल्यानंतर गावकऱ्यांनी अत्यावश्‍यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी आठ ते दुपारी एक यावेळेपर्यंतच शहरात गर्दी होत होती. मात्र दुपारी एक नंतर शुकशुकाट जाणवत होता. तर या संचारबंदीचा काही जणांनी गैरफायदा घेऊन दुकाने सुरु करण्यासाठी टीनपत्रे देखील लाऊन ठेवले होते.

शासनाने संचारबंदीमध्ये शिथीलता दिल्यानंतर आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरु राहात आहेत. त्यामुळे आता शहरवासीयांनी घराबाहेर पडून मोकळा श्‍वास घेतला आहे. आज सकाळपासूनच बाजारपेठ गर्दीने गजबजली होती. काही ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला असला तरी कोरोनाच्या भितीमुळे दुकानांमधून मात्र सॅनेटायझरचा वापर होत असल्याचे चित्र होते.

दरम्यान, आज पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. मुख्याधिकारी पाटील यांच्यासह पालिकेचे कर्मचारी तसेच उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांचे पथक बंदोबस्तासाठी हजर होते. शहरातील गजबजलेला भाग असलेला जवाहर रोड व महात्मा गांधी चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. या शिवाय शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला आहे. त्यामुळे आता शहरानेही मोकळा श्‍वास घेतला आहे.

पोलिस मदत केंद्रही उचलून पालिकेच्या वाहनात

 महात्मा गांधी चौकात भाजीमंडई जवळ भारतीय स्टेट बँकेने पोलिस मदत केंद्र उभारले होते. मात्र या मदत केंद्राचा वापर होण्या ऐवजी अडथळाच होऊ लागला होता. त्यामुळे पालिकेच्या पथकाने हे मदत केंद्रही उचलून वाहनात टाकून दिले.

0