आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसतीच आकडेमाेड:‘बीओटी’त मनपाला काेट्यवधींचा ताेटा; शहागंजमधील भाजीमंडईचा प्रकल्प रद्द

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेला उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून १५ वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या दहा वर्षांत दहा इमारतीदेखील पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मनपाला यातून फायदा तर मिळालाच नाही, उलट कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. शहागंज येथील भाजीमंडईचा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

महापालिकेच्या शहरातील मालमत्तांची किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील दहा ठिकाणच्या जागा बीओटी तत्त्वावर विकासकाला दिल्या आहेत. प्रकल्प मंजूर करताना अधिकाऱ्यांनी मोठमोठी आकडेवारी सादर करून मनपाला कसा आर्थिक फायदा होईल हे पटवून दिले. मात्र, अनेक प्रकल्प १० ते १२ वर्षांपासून रखडले आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा फटका बसत आहे. विकासकासोबत करारानुसार कामांची मुदत केव्हाच संपली आहे. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देण्यात आली, परंतु प्रकल्पांचे फक्त सांगाडेच उभे आहेत. त्यामुळे हे प्रकल्प विकासकांचा फायदा करण्यासाठीच हाती घेण्यात आले होते काॽ अशी चर्चा सुरू आहे.

विकासकांमध्ये वाद, कुठे अवैध धंदे विकासकांना जागा ताब्यात देताना मनपा प्रशासनाने कुठलीही खबरदारी घेतली नाही. काही ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर न्यायालयीन वाद उभे राहिले. शहागंज येथील भाजीमंडईचा वाद सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा लागला. औरंगपुरा भाजीमंडईदेखील वादात सापडली आहे. वसंत भुवन येथे विद्युत रोहित्रामुळे काम ठप्प आहे. सिद्धार्थ उद्यानातील व्यावसायिक गाळ्यांमध्ये दोन विकासकांमध्ये वाद सुरू झाल्यामुळे तेथील विक्री थांबवण्यात आली आहे. ज्योतीनगरातील राका सेंटर पोलिस कारवाईमुळे बंद आहे.

२००६ मध्ये मांडला हाेता प्रस्ताव तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी २००६ मध्ये बीओटीचे धोरण स्वीकारले. आतापर्यंत दहा जागा बीओटी करारावर विकासकांना दिल्या आहेत. तेथे व्यावसायिक इमारती उभारून त्यापासून मनपाने आर्थिक उत्पन्न मिळवणे अपेक्षित होते. रेल्वेस्टेशनवरील व्यावसायिक इमारत व शहानूरवाडी येथील सचिन मुळे यांनी विकसित केलेले श्रीहरी पॅव्हेलियन या दोनच जागा विकसित झाल्या. त्यातही तब्बल साडेचार कोटी रुपये परत देऊन मनपाने श्रीहरी पॅव्हेलियन परत घेतले. एवढ्या वर्षांत मनपाला ना भाडे मिळाले ना उत्पन्न. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी काम पाहिले. ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले, पण प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे बीओटी प्रकल्पांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी अनेक वेळा सभागृहात करण्यात आली. त्याचे पुढे काहीच झाले नाही.

आता नेहरू भवनचे बांधकाम सुरू मागील दहा वर्षांत औरंगपुरा, कॅनॉटमधील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पडेगावातील कत्तलखाना हे प्रकल्प सुरू झाले नाहीत तरीही टीव्ही सेंटर येथील व्यावसायिक गाळे बांधताना मनपाने लिलाव पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे सुमारे १३ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. त्यानंतर कंत्राट देऊन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. आता नेहरू भवनचे बांधकाम सुरू झाले आहे. या ठिकाणीदेखील व्यावसायिक गाळे बांधण्यात येत आहेत. दहा प्रकल्पांमध्ये एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन, अथर्व डेव्हलपर्स, प्रकाश डेव्हलपर्स, सचिन मुळे, राका हे विकासक म्हणून पुढे आले आहेत.

प्रकल्पांचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेऊ विविध ठिकाणी सुरू असलेल्या बीओटी प्रकल्पांचा आढावा घेऊन याेग्य निर्णय घेतला जाईल. विकासकांना वेगाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. अभिजित चौधरी, मनपा प्रशासक

बातम्या आणखी आहेत...