आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छता:भिंतीवर थुंकणाऱ्यांना मनपा ठोठावणार दंड ; चौधरी यांनी मुख्यालयाची केली पाहणी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या स्वच्छतेची जवाबदारी असलेल्या मनपाचे मुख्यालयच अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेले आहे. नवीन मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्यालयाची पाहणी केली असता जागोजागी भिंती पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. शौचालयेही अस्वच्छ दिसून आली. अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावर चौधरींनी नाराजी व्यक्त केली. तसेच मनपा कार्यालयाच्या भिंतीवर थुंकणाऱ्यांकडून दंडवसुलीचे आदेश दिले.

मनपाच्या प्रशासकीय कामकाज चालणाऱ्या इमारतींची रंगरंगोटी, डागडुजी व किरकोळ दुरुस्त्या त्वरित करण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले. तसेच दोन्ही इमारतींच्या सफाईसाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी ठेवण्यासही सांगितले. वाहनतळात फक्त मनपाची वाहने असतील. रात्रीच्या वेळी काही खासगी वाहने मनपा इमारतीत उभी असतात. हे प्रकार बंद करण्याचे फर्मान त्यांनी सुरक्षा रक्षकांना काढले. रात्रीच्या वेळेस इथे माजी सैनिक तैनात करा. कोणी दमदाटी केली तर थेट गुन्हा दाखल करा, असे आदेशही दिले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे आदी उपस्थित होते.

उत्तर देता देता दमछाक : प्रशासकांच्या अचानक पाहणीने अधिकाऱ्यांची उत्तरे देता देता दमछाक झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासकांनी मनपा मुख्यालयात थांबून कामकाजाची पद्धत समजून घेतली. शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक त्यांनी नगररचना विभागापासून पाहणीला सुरुवात केली. मालमत्ता विभागाचे कामकाज कसे चालते, आपत्कालीन व्यवस्थापनाचे अधिकारी येथे काय काम करतात याची माहिती घेतली. अतिक्रमण हटाव विभागात कोणीही नव्हते. एक इमारत निरीक्षक होते. त्यांनीच संपूर्ण माहिती आयुक्तांना दिली. पोलिस किती आहेत, त्यांचा पगार कोण करतो हे समजून घेतले. झोन क्रमांक १ मध्ये त्यांनी बराच वेळ दिला. मालमत्ता कर, पाणीपट्टीची बिले कशा पद्धतीने दिली जातात, जुने रेकॉर्ड कसे ठेवले आहे, स्वच्छतेसाठी किती कर्मचारी आहेत याची माहितीही घेतली.

बातम्या आणखी आहेत...