आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांत दुसरा खून:अर्धनग्नावस्थेतील अनोळखी महिलेचा खून, औरंगाबादच्या बजाजनगरमधील धक्कादायक घटना; पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या खुनातील आरोपींची नुकतीच न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच पुन्हा औरंगाबादच्या बजाजनगरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एसटी कॉलनीत दोन्ही हात बांधलेल्या अर्धनग्नावस्थेतील महिलेचा मृतदेह आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त, उपायुक्त आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, कुठलाही ठोस पुरावा न मिळाल्याने तसेच मृत महिलेची ओळख न पटल्याने खुनाचा उलगडा कसा करणार याबाबत पोलिस संभ्रमात आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील एसटी कॉलनीत एका अनोळखी अंदाजे ३८ ते ४० वर्षीय महिलेचा अर्धनग्न व हात बांधलेल्या आवस्थेतील मृतदेह येथील रहिवासी महिलेच्या निदर्शनास आला. ही माहिती महिलेने तिच्या पतीला दिली. पतीने घराबाहेर येऊन पाहिले असता त्यालासुद्धा नाका-तोंडातून रक्तस्त्राव होणारी व अर्धनग्नअवस्थेत पाठीवर निपचित पडून असणारी महिला दिसून आली. पुढे त्यांनी ही माहिती पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश पुंड यांना दिली. त्यानंतर पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आल्याने वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, प्रशांत पोतदार यांनी इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

महिला ज्यांच्या घरासमोर मृतावस्थेत पडून होती त्या अनिल वराडे व अतुल राणे यांच्याकडून पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली. दोन्ही हात बांधलेले, अंगावर अपुरे कपडे, नाका तोंडातून व डोक्यातून रक्तस्राव होणाऱ्या महिलेला घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा.पोनि.मदनसिंग घुनावत, पोलीस कॉन्स्टेबल खाडे आदींनी उचलून स्ट्रेचरहुन पोलीस व्हॅनमधून घाटीत रवाना केले.

सीसीटीव्ही होते पण; 'बंद'
मृत महिलेची ओळख न पटल्याने तसेच घटनास्थळी कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने स्थानिक निरीक्षक मधुकर सावंत तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यास सांगितले. शिवाय घराघरात जाऊन इतरही काही माहिती गुप्त पद्धतीने घेण्याचे आदेश दिले. घटना घडली तेथून अवघ्या शंभर फुटावर एका खांबावर सीसीटीव्ही कॅमेरा होता मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तो निखळून पडला होता. त्याशिवाय दोन घरांवर कॅमेरे होते.

श्वान जागीच घुटमळत राहिले
खुनाची माहिती मिळाल्यानंतर श्वान व फॉरेन्सिंग लॅबच्या पथकाने घटनास्थळ गाठुन पुरावा शोधण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी असणाऱ्या महिलेच्या नाखातील तसेच घटनास्थळी असणाऱ्या रक्ताचे नमनुे तपासणीसाठी घेतले. तर, श्वान टिपु मात्र, पाऊस पडून गेल्याने मारेकऱ्याचा मार्ग शोधण्यास असमर्थ राहिला. तो घटनास्थळीच काही वेळ घुटमळत राहिला. यावेळी श्वान पथकाचे एम.एम.तनपुरे, ए.व्ही.मोरे, ए.के.महेर आदींची उपस्थिती होती.

पोलिस आयुक्तांकडून पाहणी
सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपयुक्त निकेश खातमोडे, सहाययक पोलीस आयुक्त विवेक सराफ, वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, गुन्हे शाखेचे अविनाश आघाव, फौजदार अमोल देशमुख, विठ्ठल चासकर,राजेंद्र बांगर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची बारकाईने पाहणी करत पोलिसांना काही सूचना केल्या. त्यात घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी चार चाकी वाहन घेऊन जाता येत नाही. तसेच मृत महिला शरीराने मजबूत असल्याने तिला उचलून या ठिकाणी आणून टाकणेसुद्धा शक्य नाही. या गोष्टी लक्षात घेऊन तपासाची दिशा ठरवण्याचे आदेश दिले. तसेच परिसरातील किमान १०० मीटर परिसरात कोण-कोण भाडेकरू, घरमालक कुठे गेले आहेत. कंपनीत असतील तर तशी खात्री करून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. प्रथमदर्शनी सदरील महिलेच्या दोन्ही हातांना स्कार्फने बांधून दोन्ही हात, मान, गळा, चेहरा आदी ठिकाणी जबर मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याने हा प्रकार अनैतिक संबंधातुन घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मारेकऱ्याने मृत महिलेच्या अंगावर जाण्यापूर्वी तिचीच साडी पांघरून घालत तो पसार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...