आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा रक्तबंबाळ:तीन जिल्ह्यांत सात जणांचा खून, नांदेडमध्ये मठाधीश पशुपती महाराजांसह शिष्याचा खून

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बातमी नकारात्मक, पण वाचकांच्या माहितीसाठी
  • बीड : संशयी पतीने पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या
  • लातूर : क्वॉरंटाइनचा वाद; चालकाने केला दोघांचा खून

कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच रविवारी खुनाच्या तीन घटनांनी मराठवाडा हादरून गेला. उमरी तालुक्यातील नागठाण (जि. नांदेड) येथे मध्यरात्री मठाधीश बालतपस्वी निर्वाणरुद्र पशुपती महाराज व त्यांच्या शिष्याचा गळा आवळून खून झाला. बीड शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह दोन लहान मुलांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. निलंगा तालुक्यातील बाळेगाव येथे एका ट्रकचालकाने त्याला होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला देणाऱ्या दोघांना चाकूने भोसकून जागीच ठार केले.

नागठाणा : लॉकडाऊनमध्ये पॅरोलवर सुटून महाराजांसह दोघांचा खून

नांदेड | उमरी तालुक्यात नागठाणा (खुर्द) येथील मठाधीश बालतपस्वी निर्वाणरुद्र पशुपती महाराज व त्यांचे शिष्य भगवान शिंदे यांची रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमाराला एका चोरट्याने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी साईनाथ आनंदा लिंगाडे यास अटक केली. येथील महादेव मंदिराचे मठाधीश निर्वाणरुद्र पशुपती महाराज (३४) मठाच्या तळमजल्याच्या खोलीत झोपले होते. लॉकडाऊनमध्ये पॅरोलवर सुटलेला आरोपी साईनाथ आनंदा लिंगाडे हा मध्यरात्री २ च्या सुमारास तेथे गेला. त्याने व्हरंड्यात झोपलेला महाराजांचा शिष्य भगवान शिंदेला (५४, चिंचाळा) मठाबाहेर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. नंतर जि.प. शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन गळा आवळून खून केला.

मृतदेहासह पसार होण्याचा प्रयत्न :

साईनाथ हा महाराजांच्या खाेलीचा दरवाजा तोडून पैसे, वस्तू घेऊन जात असताना महाराजांना जाग आली. त्याने महाराजांचाही गळा दाबून खून करत मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकला. कार व मृतदेहासह पसार होण्याच्या प्रयत्नात कार गेटमध्ये अडकली. यामुळे वरच्या खोलीतील अनुयायांनाही जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच साईनाथ दुचाकी घेऊन पसार झाला.

लातूर : क्वॉरंटाइनच्या वादात खून

लातूर | जिल्ह्यातील बोळेगाव (ता. निलंगा) येथील मूळ रहिवासी असलेला विद्यावान बरमदे मुंबईत राहतो. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातहून ट्रक घेऊन बोळेगावमध्ये दाखल झाला. रेड झोनमधून आल्याने लोकांनी त्याला विलगीकरणात राहण्याचे सुचवले. तो गावात फिरत असल्यामुळे लोकांनी त्याला हटकले. राग आल्याने बरमदेसह काही लोकांनी रविवारी पहाटेच शहाजी पाटील यांचे घर गाठले. शहाजी पाटील यांच्यावर वार केले. त्या वेळी त्यांचा पुतण्या वैभव पाटील आणि इतर बचावासाठी धावले असता त्यांच्यावरही वार केले. यात शहाजी व वैभव जागीच मृत्युमुखी पडले.

बीड शहरात तिहेरी हत्याकांड

बीड | पेठ बीड भागातील तकवा कॉलनी परिसरात संतोष कोकणे हा पत्नी संगीता व ३ मुलांसह वास्तव्यास होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. ३ दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. रविवारी पहाटे संतोष याने पत्नी संगीता (३५) हिच्या डोक्यात बॅट व दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर मधला मुलगा सिद्धेश (११) याचाही असाच खून केला. लहान मुलगा बल्लू ऊर्फ कल्पेश (६) याला पाण्याच्या टाकीत बुडवून मारून टाकले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात पत्नीच्या विरोधातच संतोष याने अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता.

नगरमध्ये साधूला मारहाण

नगर | कुकाणे - चिलेखनवाडी-अंतरवाली हद्दीवर असलेल्या महादेव मंदिरातील साधूला दोघा तरुणांनी वायरने मारहाण केली. शनिवारी रात्री हा प्रकार मंदिरात झाला. मात्र साधूने फिर्याद देण्यास नकार दिला. अखेर आरोपींनी माफीनामा लिहून दिला.

बातम्या आणखी आहेत...