आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सरपंचनगर येथे २०१९ मध्ये एका व्यक्तीच्या मृत्युप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, तिसऱ्यांदा घेण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालानंतर ही घटना अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ९ फेब्रुवारीला खुनाचा गुन्हा दाखल झाला. खून झालेली व्यक्ती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नी व मुलानेच दोघांना एक लाखाची सुपारी दिली होती. भाग्यनगर पोलिसांनी पत्नीला अटक केली असून मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सरपंचनगर येथील शरद कुऱ्हाडे हा दारू पिऊन पत्नी अश्विनी व मुलगा आनंदला क्षुल्लक कारणावरून वाद घालून त्रास देत होता. शिवाय त्यांचे राहते घर विक्री करण्याचा घाटही त्याने घातला होता. त्यामुळे त्याची पत्नी व मुलाने शहरातील शुभम गायकवाड, विशाल गव्हाणे यांना एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. १४ ऑगस्ट २०१९ रोजी सरपंचनगर येथील त्यांच्या घरात शरदच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला मारण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटना घडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. दरम्यान, यासंदर्भात महिनाभरापूर्वी शवविच्छेदनाचा तिसऱ्या अहवालावरून ही घटना खून असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पत्नी, मुलगा व शुभम गायकवाड, विशाल गव्हाणे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक शेख यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला.
सासू-सुनेच्या भांडणावरून संशय बळावला
मृत शरद याच्या पत्नीचे व आईचे सारखे भांडण होत होते. या भांडणातून माझ्या मुलाला तुम्हीच मारल्याचे त्या सांगत होत्या. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार शवविच्छेदनाचा तिसरा अहवाल मागवल्यानंतर खून असल्याचे उघड झाले. त्यानंतर घरच्यांना ताब्यात घेतले, असे पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.