आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षात मनपाने औरंगाबादकरांना अनोखी भेट दिली आहे. सिद्धार्थ उद्यानातील अनेक वर्षांपासून बंद असलेले संगीत कारंजे पुन्हा सुरू होणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर रंगीबेरंगी कारंजे पर्यटकांचे मनोरंजन करणार आहेत. कारंज्यांचे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. तेथे येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे यासाठी महापालिकेने १९९७ मध्ये उद्यानात संगीत कारंजे सुरू केले होते. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या पार्श्वभूमीवर हे संगीत कारंजे सुरू करण्यात आले होते. पण पुढे देखभाल-दुरुस्तीअभावी हे कारंजे बंद पडले. प्रशासनालाही या कारंज्यांचा विसर पडला होता. दरम्यान, शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने हवा शुद्धीकरण उपक्रमांतर्गत औरंगाबाद महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून महापालिकेने शहरातील विविध चौक तसेच उद्यानातील कारंजे सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निधीतून सिद्धार्थ उद्यानातील कारंजे सुरू करण्यात येत आहेत. कारंज्यांचे काम अंतिम टप्प्यात अाहे. सुमारे अर्धा एकर जागेत हे कारंजे आहेत. कारंज्यांच्या बाजूला हिरवळ तयार करण्यात आली असून त्यावर बसून पर्यटक कारंजे पाहू शकतील, असे विजय पाटील यांनी सांगितले.
उद्यानाची वाढणार वेळ : अंधार पडल्यानंतर रंगीबेरंगी संगीत कारंज्यांचा आनंद पर्यटकांना घेता येईल. त्यामुळे प्रशासनाला उद्यानाची वेळ वाढवावी लागणार आहे. सध्या उद्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू असते. ही वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे.
येथेही सुरू होणार कारंजे सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून महावीर चौक, जुना मोंढा, धूत हॉस्पिटलसमोरील चौक, सिडको एन-१, दमडी महल, स्वामी विवेकानंद उद्यान, नेहरू बाल उद्यान, सलीम अली सरोवर उद्यान, ज्योतीनगर येथील कवितेच्या बागेसह सिद्धार्थ उद्यानातील बंद पडलेले संगीत कारंजे सुरू करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.