आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिकूल परिस्थितीवर मात करत औरंगाबादची युवा खेळाडू रमा गौतम जगतापची थायलंडमध्ये मे महिन्यात होणाऱ्या जागतिक पॅरा आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. खेळाचे महागडे साहित्य नसतानाही मैत्रिणीकडील साहित्यावर सराव करत रमाने हे यश मिळवले. त्यामागे ट्रकचालक वडील, गृहिणी आईचे पाठबळही तितकेच माेलाचे आहे. ‘घरातील सोने मोडून आई मंगलने माझे करिअर घडवण्यासाठी मदत केली. आता भारतासाठी सुवर्णपदक मिळवून मला तिचे ऋण फेडायचेआहे,’ अशा भावना रमाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या.
‘एटीडी’चा कोर्स केलेली ३० वर्षीय रमा चितेगाव येथील जि.प. शाळेत कंत्राटी चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होती. एका पायाने ती दिव्यांगआहे. चितेगावच्या शाळेत तिची दिव्यांग तलवारबाजी खेळाडू व शिक्षक विनय साबळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला तलवारबाजी खेळासाठी प्रोत्साहन देऊन प्रशिक्षण दिले. तिनेही सहा वर्षे मेहनत घेत तयारी केली. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चेन्नईला जाताना रेल्वेत चढताना रमा पडली व तिच्या पायाला दुखापत झाली.
त्यानंतरही तिने माघार न घेता स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता. खासदार इम्तियाज जलील यांनी रमाला २० हजारांची मदत केली होती. मात्र तिने वैयक्तीक खर्च न करता सर्व खेळाडूंसाठी सामूहिकरीत्या खरेदी करावयाच्या व्हीलचेअरसाठी ही रक्कम दिली. या खेळासाठी व्हीलचेअर, तलवार, ड्रेस, इलेक्ट्रिक साहित्य, चेस गार्ड आदी साहित्य खरेदीसाठी ३.५ ते ४ लाख रुपये खर्च येतो. हा खर्च परवडत नसल्याने औरंगाबादचे पॅरा खेळाडू एकत्र मिळून साहित्य वापरतात. रमा साई केंद्रात तुकाराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.