आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:नड्डांनी कायम ठेवला औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याबद्दल भाजपचा सस्पेन्स

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने देशात १६० आणि महाराष्ट्रात १८ लोकसभेच्या अतिरिक्त जागा लढवण्याची रणनीती तयार केली आहे. या १८ जागांमध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. २ जानेवारी रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकणार असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात सोमवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत नड्डांनी औरंगाबाद लोकसभा आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचाराविषयी अवाक्षरही काढले नाही. मात्र, शिंदे - फडणवीस सरकार विकासाची चांगली कामे करत असून या सरकारच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. औरंगाबादेतील १ लाख १८ हजार घरांना केंद्र सरकार पाणीपुरवठा करणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, आजारपणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला येऊ शकले नाहीत. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाची उणीव कार्यकर्त्यांना भासली. मात्र, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आवर्जून सभेला उपस्थित होत्या. मविआ सरकार घराणेशाहीचा पुरस्कार करणारे होते. पालघरला साधू्ंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यास उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना नकार दिला. सत्तेपुढे उद्धव ठाकरेंचे विचार छोटे झाले होते. यापूर्वी साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी २५-३० वर्षे लागत होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२० कोटी कोरोना लसीतून १३० कोटी जनतेला वाचवले, असे नड्डा म्हणाले. भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, एजाज अहमद, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, बापू घडामोडे, राहुल लोणीकर आदींची भाषणे झाली.

फडणवीसांची उणीव जाणवली : औरंगाबादकरांना अस्सल मराठी किंवा खुमासदार हिंदीतील भाषण ऐकण्याची सवय आहे. विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी मनपावर काढलेला मोर्चा त्यांच्या भाषणामुळे गाजला होता. पण, सोमवारी फडणवीस सभेसाठी येऊ शकले नाही. पंकजा मुंडे यांनी आपण भाजपच्या संस्कारात वाढल्याचे सांगत वेळेअभावी भाषण संपवले.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना संदर्भ दिला बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रप्रेमाचा; पण तोंडी नाव मात्र देवरस यांचे ‘निवडणुकीपूर्वी मोदींनी ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा केली होती. पण नंतर खुर्चीच्या लालसेने उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राष्ट्रवादी विचारांसाठी बाळासाहेब ज्यांच्याशी आयुष्यभर लढले, त्यांच्याशीच उद्धव यांनी हातमिळवणी केली,’ असा आरोप नड्डा यांनी केला. मात्र बाळासाहेबांच्या राष्ट्रप्रेमाचे उदाहरण देताना नड्डांनी चुकून ठाकरेंएेवजी ‘देवरस’ (संघाचे तृतीय सरसंघचालक) असा उल्लेख औरंगाबादच्या सभेत केला.

आव्हाड यांचे वक्तव्य धोकादायक : बावनकुळे आ. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाविषयी केलेले वक्तव्य धोकादायक असल्याचे बावनकुळे म्हणाले. खासदार इम्तियाज जलील बोलघेवडे आहेत. यापूर्वीच्या खासदारांनीही कुठलेही काम केले नाही. मविआ सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेले, अशी टीका डॉ. कराड यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. केणेकरांनी औरंगाबाद लोकसभा भाजपने लढवावी, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांचेही भाषण झाले.

सभेनंतर कोअर कमिटीची बैठक सभेनंतर नड्डा वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात गेले. तेथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या कुंडाच्या सुशोभीकरण आणि लाइट शोच्या कामाचे भूमिपूजन केले. रात्री उशिरा आयएमए हॉल येथे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ८० सदस्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.

मनपा निवडणुकीमुळे गर्दी भाजपने प्रत्येक वाॅर्डातील २०० नागरिक सभेला आणण्याची जबाबदारी वाॅर्डप्रमुख, भावी नगरसेवकांना दिली होते. त्यामुळे गर्दीच्या २५ हजारांच्या टार्गेटजवळ पोहोचण्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले. सायंकाळी ५ वाजेपासून लोक येत होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

बातम्या आणखी आहेत...