आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन; औरंगाबादसह 14 थांबे; 60% जमीन समृद्धीची, 40% शेतकऱ्यांची

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद-जालन्याचा समावेश, सर्वेक्षण सुरू

मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने हा रेल्वेमार्ग असेल. समृद्धी महामार्गासाठी आधीच संपादित ६० टक्के जमीन यासाठी वापरली जाईल. उर्वरित ४० टक्के जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केली जाईल. या पार्श्वभूमीवर बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यातील संबंधित गावातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्यासमोर प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यात आले. या वेळी संपादित जमिनीला एकच भाव ठरवावा, यात दुजाभाव नको, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला रेल्वे मंत्रालयाने देशातील ८ हाय स्पीड रेल कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिले आहे. त्यापैकी अहमदाबाद-मुंबई या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू असून नागपूर-मुंबईसह इतर प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी सांगितले.

असा मिळेल मावेजा
भूसंपादनाचा मावेजा शहरी भागातील बाजारभावाच्या किंवा वर्तुळाच्या रकमेच्या दुप्पट राहील, तर ग्रामीण भागातील बाजारमूल्याच्या चौपट राहील. नवीन भूमी अधिग्रहण कायदा २०१३ च्या कलम १२६ नुसार एलएएलओद्वारे मोजणी केली जाईल. या दोन्हीपैकी जाे मावेजा अधिक असेल ताे शेतकऱ्यांना दिला जाईल. जमीन मालकाकडून जागेचे दर व एकूण मूल्य यावर सहमती घेतली जाईल, असे संबंधित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

औरंगाबाद-जालन्याचा समावेश, सर्वेक्षण सुरू
नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाप्रमाणे ही बुलेट ट्रेनही ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा व नागपूर या दहा जिल्ह्यांमधून जाईल. रेल्वेत प्रवासी क्षमता ७५० असेल. प्रकल्पाची लांबी ७३९ किमी आहे. यात १४ स्थानके असतील. २८ तालुक्यांतील ३८७ गावांमधील १२४५.६१ हेक्टर जमीन त्यासाठी संपादित केली जाईल. या मार्गावर २५ किलोमीटरचे एकूण १५ बोगदे असतील. यात सर्वाधिक लांब बोगदा ८.३६ किमीचा असेल.

बुलेट ट्रेनचे थांबे
ठाणे, शहापूर, घोटी बुद्रुक, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी व अजनी आदी थांबे देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...