आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनाच्या दुष्टचक्रावर नांदेडमध्ये अशीही मात, स्मशानभूमीतून मिळालेला युजर आयडी-पासवर्ड टाकून घेता येईल अंत्यदर्शन

नांदेड2 महिन्यांपूर्वीलेखक: शरद काटकर
  • कॉपी लिंक
  • परदेशात राहणाऱ्या लोकांसाठी गोवर्धन घाटावर शांतिधाम प्रतिष्ठानने केली सोय
  • 55 हजारांच्या देणगीतून बसवले आठ सीसीटीव्ही

कोरोनामुळे जवळचा माणूस गेल्यानंतर त्याचे अंत्यदर्शनही घेता येत नसल्याचे शल्य अनेकांना आहे. विशेषत: देश-विदेशातील रक्ताच्या नात्यातील लोकांना अंतिम दर्शन घेता यावे यासाठी शांतिधाम प्रतिष्ठानच्या वतीने गोवर्धन घाट स्मशानभूमीत चार दिवसांपूर्वी ८ सीसीटीव्ही बसवले आहेत. चार दिवसांत कॅमेऱ्यांना इंटरनेट जोडणी दिली जाणार असून युजर आणि पासवर्ड दिल्यानंतर नातेवाइकांना अंतिम दर्शन घेता येईल. यातील चित्र झूम केल्यानंतर ते जवळून दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात आहे.

ही संकल्पना शांतिधाम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हर्षद शहा यांनी मांडली. याला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, ग्यानोबा गणपती फुके यांच्या मातोश्रींचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनी काही तरी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी दिलेल्या ५१ हजार रुपये सेवेसाठीच्या भरीव देणगीतून गोवर्धन घाटावर ८ सीसीटीव्ही बसवण्यात आले. समक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्यांना हा फार मोठा दिलासा ठरेल, किमान अंत्यदर्शन तरी करता येईल, असे हर्षद शहा म्हणाले. दरम्यान, सीसीटीव्हीमुळे या भागातील चोऱ्यांना आळा बसला आहे. पूर्वी या ठिकाणी लाकडांची चोरी होत होती. तसेच परिसरात दुरुपयोग होत होता. आता परिसर सुरक्षित झाला आहे.

१८ वर्षांपासून प्रतिष्ठानची निरंतर सेवा
१८ वर्षांपासून घाट सुशोभीकरणासह निरंतर सेवा शांतीधाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष विजय मालपाणी, श्रीनिवास इनामदार, डॉ. विजय शर्मा, मनोहर जाधव आदी मंडळी नेटाने करत आहेत. नुकतेच या ठिकाणी सहा नवीन पिंजरे बसवण्यात आले आहेत. पार्थिव शरीरासाठी शीतपेटी, स्टीलच्या तिरड्या, पालखी, अंत्यविधी साहित्य ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येते, असे शहा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...