आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताण हलका:नांदेडात कोरोना येतोय नियंत्रणात; मृतांचा आकडाही दहाच्या आत; एक आठवड्यापासून दिलासादायक चित्र, रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : शासकीय रुग्णालयात वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले. - Divya Marathi
नांदेड : शासकीय रुग्णालयात वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले.
  • 21 मेपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 988 जणांचे लसीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेडमध्ये हाहाकार माजवला. रोज दीड हजारावर कोरोनाबाधित, तर २५ च्या पुढे मृतांची संख्या होती. आठ दिवसांत यात कमालीची घट झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५० च्या आत, मृत्यूची संख्या १० च्या आत आली आहे. तूर्तास तरी आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. मार्चपासून जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडसाठी प्रतिक्षायादी वाढत चालली होती. शिवाय अंत्यविधीसाठीही वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. यासोबतच ऑक्सिजन, रेमडिसिवरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना पळापळ करावी लागली.

जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळीवर उपयायोजना करण्यात येत होत्या. दरम्यान, २५ मार्चपासून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावले होते. पुढे शासनानेही २२ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करून कडक निर्बंध लागू केले होते. दरम्यान, बाजारपेठ पूर्णत: बंद असली तरी रस्त्यावर मात्र वाहतूक सुरूच होती. प्रशासनाने कडक पावले उचलून काही दिवस विनाकरण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली. तसेच महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून दंड वसूल केला.

या कारवाईमुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणज ग्रामीण भागातही गावबंदी, शेतात विलगीकरण, नियमित सॉनिटायझरच्या फवारण्या, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले सर्वेक्षण तसेच लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या वाढवून बाधितांवर उपचारामुळे रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८७ हजार ८९६ रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी ८३ हजार ८९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यःस्थितीत एक हजार ७२५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एक हजार ८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात खाटाही आहेत उपलब्ध
नांदेड जिल्ह्यात १६ ते २३ मे या आठ दिवसांत रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४० टक्के नोंदवले गले आहे. २१ मेपर्यंत चार लाख १३ हजार ९८८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खासगी व शासकीय रुग्णालयातील खाटाही रिकाम्या झाल्या आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ९८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात ८०, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ३२ खाटा उपलब्ध आहेत.

२१ मेपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार ९८८ जणांचे लसीकरण

  • कोरोनाबाधित आढळले मागील ८ दिवसांत - १२८३
  • जणांच्या मृत्यूची नोंद ८ दिवसांत - ५३
  • टक्के संसर्गाचा दर सध्या जिल्ह्यात - ५.१६
बातम्या आणखी आहेत...