आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मक्षेत्र:कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून ५१ किमीवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसली आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते. या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.१३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यासदीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. १४३४ मध्ये त्यांनी औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली.कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच दत्त पादुका आहेत.

वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. मंदिराभोवती मोठा मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध मनोहर पादुका आहेत. गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढवला आहे. मध्यभागी गणेशपट्टी, आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवली आहे. सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले.

तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड दोन गावे देवस्थानच्या पूजाअर्चासाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. मंदिरावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे लांबट आकाराची उंच वास्तू आहे.

बातम्या आणखी आहेत...