आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:नासाच्या निवड प्रक्रियेचे यान भरकटले, चुकीच्या माहितीवर दीक्षा शिंदेची निवड झाल्याचा खुलासा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावीतील औरंगाबादच्या दीक्षा शिंदे हिची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड अशा आशयाचे वृत्त शुक्रवारी (२० ऑगस्ट) झळकले होते. मात्र दीक्षा नासाच्या कोणत्याही पॅनलवर नसून, तिला कसलीही फेलोशिप मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नासाने दिले आहे. तसेच तिची निवड थर्ड पार्टीने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आली होती, असेही नासाने म्हटले आहे. यावर नासाच्या निवड प्रकियेचे यान भरकटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वुई लिव्ह इन ब्लॅकहोल ? ( आपण कृष्ण विवरात राहतो ?) या नावाचा एक संशोधन पेपर मे २०२१ मध्ये सादर केला होता व त्याआधारे अल्पसंख्याक सेवा संस्था (एमएसआय) फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलिस्ट म्हणून आपली नासाने नियुक्ती केल्याचा दावा दीक्षा हिने केला होता. त्यासाठी नासाकडून मानधन मिळ‌ते असेही तिने म्हटले होते. मात्र याची खातरजमा करण्यासाठी एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने नासाशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. या ई-मेलला नासाच्या कॅतरिन ब्राऊन यांनी उत्तर दिले असून त्यात दीक्षा शिंदे नासाच्या कोणत्याही पॅनलवर नियुक्त नसून, तिला कसलेही मानधन देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया थर्ड पार्टीकडून होते, दीक्षाबाबत चुकीच्या माहितीआधारे ही नियुक्ती करण्यात आली होती. या फेलोशिपसाठी फक्त अमेरिकेचे नागरिकच पात्र असून नासाने दीक्षाचा एकही संशोधन पेपर स्वीकारलेला नाही. दीक्षाच्या अमेरिका वारीसाठीचा खर्च नासा करणार असल्याचा दीक्षा हिचा दावा खोटा असल्याचे ब्राऊन यांनी या ई-मेलमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणाचा तपास नासाचे महानिरीक्षक कार्यालय करणार आहे.

मी चूक केलेली नाही, ‘नासा’मधील माझी निवड अधिकृतच
याबाबत दीक्षाने दिव्य मराठीशी बाेलताना सांगितले, ‘सर्व आराेपी चुकीचे आहेत. मी सामान्य कुटुंबातील असून ‘नासा’ने फेलाेशिप पॅनलवर केलेली माझी निवड गुणवत्तेच्या आधारावरच झाली हाेती. त्याबाबत मला नासाच्या अधिकृत वेबसाइटवरून विचारणा करण्यात आली हाेती. नासासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसाेबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला हाेता. त्यासाठी मेहनतही घेतली. दाेन वेळा त्यांना ‘वुई लिव्ह इन ब्लॅकहाेल’ या विषयावर माझे लेख पाठवले. त्यांनी दाेनदा रिजेक्ट केले. नंतर सातत्याने सुधारणा करून ते मी पुन्हा पाठवले तेव्हा तिसऱ्यांदा त्यांनी हे संशाेधनपर लेख स्वीकारले. मला ही संधी देताना नासाकडून कुठलीही कागदपत्रे किंवा फी मागण्यात आली नव्हती. त्यामुळे मी खाेटी कागदपत्रे पाठवली असे म्हणणे चुकीचेच आहे. एक वर्षापासून मी ‘नासा’साेबत जाेडली गेलेले आहे. हे खाेटे असते तर नासाने यापूर्वीच आक्षेप घेतले असते. आतापर्यंत त्यांच्याशी ऑनलाइन मीटिंग्जही झाल्या आहेत. आजही अशा मीटिंग्ज सुरू आहेत.

नासाच्या निवड प्रक्रियेचे..मला नियमित मेलही येतात. आतापर्यंत मला ५० हजार रुपये त्यासाठी मानधनही मिळालेले आहे. आपण कोणतीही चुकीची माहिती दिली नाही. मी प्रपोजलमध्येच माझं वय आणि विषय कळवळा होता, त्यानंतर मला ‘नासा’कडून प्रमाणपत्र मिळाले. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी आमंत्रित करण्यात आले,’ असे दीक्षाने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.दीक्षाची आई रंजना शिंदे म्हणाल्या, ‘माझ्या मुलीबाबत चुकीची माहिती साेशल मीडियातून फिरवली जात आहे. तिला टार्गेट केले जात आहे. तिची निवड गुणवत्तेच्या आधारे व अधिकृतपणेच झालेली आहे. आपण स्वतः याबाबतचे सर्व मेल पाहिले आहेत. आम्ही नेहमी तिच्या ‘नासा’शी हाेणाऱ्या ऑनलाइन मीटिंगही पाहताे. तिच्या लेखाच्या विषयाला काहींचा विराेध असू शकतो, पण निवडीवर आक्षेप घेणे याेग्य नाही. आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी उभे आहाेत.’

बातम्या आणखी आहेत...