आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय सायकलिंग महासंघ व महाराष्ट्र सायकलिंग संघटनेतर्फे आयोजित 27 व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेतील पहिला दिवस राजस्थानच्या सायकलपटूंनी गाजवला. टाईम ट्रायल विभागात महिलांच्या एलिट गटात राजस्थानच्या कविता सिंगने, तर सबज्युनियर गटात राजस्थानच्या माया दुडीने सुवर्णपदक पटाकवले. महिलांच्या सबज्युनियर गटात महाराष्ट्राच्या पूजा दानोळेने कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले.
सिन्नर तालुक्यातील पाथरे ते सोनारी दरम्यान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत देशातील 31 राज्य व क्रीडा मंडळाचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमधून नॅशनल सायकलींग अकॅडमीसाठी खेळाडूंची निवड केली जाईल. स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलिस अधिकारी हरीश बैजल, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र सायकलींग फेडरेशनचे प्रताप जाधव, धनंजय वानखेडे, अविनाश कदम, अभयसिंह जाधवराव, राज्य सचिव प्रा. संजय साठे, तुकाराम नवले, निसर्गराज सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पाथरे खुर्दचे उपसरपंच दत्तात्रय चिने, पाथरे बुद्रुकच्या सरपंच सुजाता नरोडे, वारेगावचे सरपंच मंदाकिनी दवंगे, पोहेगावचे सरपंच अमोल औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कविता सिंग प्रथम स्थानी
महिलांच्या एलिट विभागातील 30 किलोमीटरच्या टाईम ट्रायलमध्ये 38.75 किलोमीटर प्रतितास वेगाची नोंद राजस्थानच्या कविता सिंगने नोंदविली. तीने 46 मिनिटे 27 सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदक पटाकावले. रेल्वेच्या मोनिका जाटने 46 मिनिटे 51.279 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर कर्नाटकची चैत्र बोर्जीने 47 मिनिटे 07.372 सेकंदाची वेळ देत कास्यपदक जिंकले.
महिलांच्या ज्युनिअर गटात राजस्थानच्या माया दुडीने वीस किलोमीटरचे अंतर 31 मिनेट 57.404 सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदक जिंकले. हरियाणाच्या अंजुने 32 मिनिटे 25.651 सेकंद तर महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने 32 मिनिटे 25.940 सेकंदाची वेळ देत अनुक्रमे रौप्य आणि कास्यपदक जिंकले.
कर्नाटकचा नवीन चमकला :
पुरुषांच्या 40 किलोमीटर टाईम ट्रायल कर्नाटकच्या नवीन जॉनने 51 मिनिटे 21.014 सेकंदाची वेळ देत सुवर्णपदक पटकावले. त्याने स्पर्धेत प्रतितास 46.74 किलोमीटरची वेग नोंदविला. रेल्वेच्या विश्वजीत सिंगने 51 मिनिटे 43.925 सेंकदाची तर सेनेच्या दिनेश कुमारने 53 मिनिटे 14.437 सेकंदाची वेळ देत अनुक्रमे रौप्य आणि कास्यपदक जिंकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.