आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा:महाराष्ट्राच्या किशोर-किशोरींची उपांत्यपूर्व फेरीत धडक, कोल्हापूर, विदर्भाच्या संघांचीही आगेकूच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्हा हौशी खो-खो संघटनेच्या अधिपत्याखाली फलटण (सातारा) येथे सुरू असलेल्या 32 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या किशोर व किशोरींची उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या किशोर आणि विदर्भच्या किशोरी संघांनी देखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

आता उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलांची गाठ केरळ संघाशी पडेल आणि मुलींची सामना गुजरात सोबत होणार आहे. दुसरीकडे, कोल्हापूरचा मुलांचा संघ पश्चिम बंगाल बरोबर आणि विदर्भाच्या मुली दिल्ली बरोबर भिडतील. आजच्या सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी डावाने विजय मिळविण्याचा धडाका कायम ठेवला आहे. किशोरांच्या सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 23-5 असा शानदार विजय साजरा केला. आशिष गौतमने आपल्या धारदार आक्रमणात 7 गुण मिळवले. हाराद्या वसावे (5:00 मि. संरक्षण व 2 गुण), राज जाधव (1:50 मि. संरक्षण व 5 गुण) व सोत्या वळवी (2:40 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किशोरींनी आंध्र प्रदेशचाच 19-3 धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या धनश्री कंक (5:20 मि. संरक्षण व 2 गुण), स्वप्नाली तामखडे (3 मि. संरक्षण व 2 गुण) व मैथली पवार (2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू कामगिरी केली. संचीता गायकवाडने 4 गुण मिळवले.

मोनिका, सिद्धेश चमकले :

मोनिकाच्या अष्टपैलू खेळामुळे विदर्भच्या मुलींनी हरियाणावर 13-11 अशी 3:50 मिनिटे राखून मात केली. कोल्हापूरच्या मुलांनी उत्तराखंडवर 12-9 असा डावाने शानदार विजय मिळविला. त्यांच्या आयानने 2:20 मिनिटे पळती तर सिद्धेशने 3 गडी बाद करीत 1:20 मिनिटे संरक्षण केले. महाराष्ट्राच्या संघांना स्पर्धेत विजेतेपदाची संधी आहे.

इतर संघांचे निकाल

मुले : उत्तर प्रदेश वि.वि. विदर्भ 15-13 पाच मिनिटे राखून, केरळ वि.वि. छत्तीसगड 15-13 पन्नास सेकंद राखून, कर्नाटका वि.वि. पाँडिचेरी 16-14, पश्चिम बंगाल वि.वि. झारखंड 22-9, हरियाणा वि.वि.मध्य भारत 13-5 डावाने, राजस्थान वि.वि. दिली 22-18. मुली - दिल्ली वि.वि. ओरिसा 17-3 डावाने, राजस्थान वि.वि. केरळ 9-8 साडे चार मिनिटे राखून, गुजरात वि.वि. उत्तर प्रदेश 16-7, तामिळनाडू वि.वि. कोल्हापूर 6-5 साडे पाच मिनिटे राखून, कर्नाटक वि.वि. छत्तीसगड 9-5 डावाने, पश्चिम बंगाल वि.वि. पाँडिचेरी 19-17.

बातम्या आणखी आहेत...