आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय किसान परिषदेचा इशारा:अतिवृष्टी अन् पीक विमा नुकसान भरपाई, 30 एप्रिलपर्यंत द्या, अन्यथा 1 मे रोजी नाथसागरात जलसमाधी आंदोलन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढी पाडव्यापासून नवीन हंगाम सुरु झाला आहे. अद्याप खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ३० एप्रिलपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा पैठणच्या नाथ सागरात १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच जलसमाधी आंदोलन केले जाईल. असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक हुड पाटील यांनी दिला आहे.

गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये एक ते सहा वेळा एकाच मंडळात अतिवष्टी झाली होती. या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा चिखल केला. त्याचे प्रशासनाने पंचनामे केले. सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, एप्रिल उजडला तरी मदत मिळालेली नाही. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन यासह प्रमुख पिके नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त झाली. तर रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने व गारपीटीने गहू, ज्वारी, हरभरा, द्राक्ष, आंबा आदी फळपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. याची भरपाईही मिळालेली नाही.

पिक विमा कागदावरच आहे. त्यामुळे नवीन हंगामात शेती मशागत कशी करावी,असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पिक कर्ज वेळेत मिळत नाही. याकडे सरकारने गांभीर्याने बघून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. अशी मागणी राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे.

३० एप्रील पर्यंत शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे तसेच अतिवृष्टी ची शासकीय मदत न मिळाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी कृषी मंत्री, महसूल मंत्री तसेच विरोधी पक्षनेते या सर्वांंच्या निषेधार्थ पैठण मधील नाथसागरात जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.