आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या विजेतेपदाचा सामना रंगणार:राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या प्रणव कोरडेची दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेतर्फे बॉम्बे जिमखाना मैदानावर आयोजित १८ वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा युवा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रणव कोरडेने तेलंगणाच्या सहकाऱ्यासोबत मुलांच्या दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईत सुरू असलेल्या या स्पर्धेत गुुरूवारी झालेल्या लढतीत प्रणवने अव्वल मानांकित जोडीचा धक्कादायक पराभव केला आहे. या स्पर्धेत १८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

स्पर्धेत सुरूवातीच्या सामन्यात प्रणव काेरडे (महाराष्ट्र) आणि नैसिक रेड्डी (तेलंगणाचा) या जोडीने ओम पारिख (महाराष्ट्र) आणि वेध ठाकूर (गुजरात) यांच्या जोडीचा 4-6, 6-1, 10-2 असा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रणव व नैसिक जोडीने महाराष्ट्राचे खेळाडू अनमोल नागपुरे आणि अर्णव कोकणे यांचा 6-3, 6-1 असा सलग सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. महत्वाच्या उपांत्य फेरीत प्रणव व नैसिक जोडीने अव्वल मानांकित तनिष जाधव (महाराष्ट्र) आणि केविन कार्तिक (तामिळनाडू) या जोडीला सरळ सेटमध्ये 6-5, 6-2 अशी परभवाची धुळ चारत धक्कादायक निकाल नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिला सेट रोमांचक झाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अव्वल मानांकित जोडीला गुण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता शुक्रवारी अंतिम फेरीत प्रणव नैसिक यांचा सामना उमर सुमर आणि चंद्रा दयान यांच्याशी मुंबई जिमखाना मैदानावर रंगणार आहे.

प्रणवचे पदक निश्चित :

या राष्ट्रीय स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचताच प्रणव कोरडेने आपले पदक निश्चित केले. तो इंड्युरन्स मराठवाडा एमएसएलटीए टेनिस सेंटरचा खेळाडू आहे. त्याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले व प्रवीण प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभत आहे.