आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Nawab Malik Ed Custody | Aurangabad Mahavikas Aghadi Leader Protest | Marathi News Aurangabad | If BJP Comes On The Streets, We Will Break Limbs; Mahavikas Aghadi In Kranti Chowk, Agitation Against Central Government, BJP

ईडीवरून खडाखडी:भाजप रस्त्यावर आला तर हातपाय तोडू; महाविकास आघाडीचे क्रांती चौकात केंद्र सरकार, भाजपविरोधात आंदोलन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार अंबादास दानवेंचा इशारा, नंतर म्हणाले : ‘जशास तसे प्रत्युत्तर देऊ’ असे म्हणायचे होते.
  • आमदार सावेंचाही प्रतिहल्ला : आम्हीही बांगड्या घातल्या नाहीत, ईंट का जवाब पत्थर से मिलेगा

‘भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खोट्यानाट्या गोष्टी घेऊन कुभांड रचतात. असे विषय घेऊन ते पुन्हा रस्त्यावर आले तर महाविकास आघाडी मिळून त्यांना आम्ही ठोकून काढू. त्यांचे हातपाय तोडू,’ असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी दिला. त्यावर भाजपनेही पलटवार केला. आमदार अतुल सावे म्हणाले की, ‘आम्हीही बांगड्या घातलेल्या नाहीत. ईंट का जवाब पत्थर से मिलेगा.’

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ, त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने आंदोलन केले. शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) क्रांती चौकात हे आंदोलन झाले. या वेळी दानवेंनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केले. आतापर्यंत भाजपसाठी कधीही न वापरलेली भाषा त्यांनी वापरली. मात्र, आंदोलनानंतर त्याविषयी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विचारणा केली असता दानवे म्हणाले की, ‘मी म्हणालो की जशास तसे उत्तर देऊ. भाजपच्या खोटारड्या धोरणाला खणखणीत उत्तर महाविकास आघाडीकडून मिळेल, असेच मला म्हणायचे आहे. ते काय करतात, यावर आमचा प्रतिसाद अवलंबून राहणारच. ’

दरम्यान, मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या या आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले होते. “महाविकास आघाडीचा विजय असो’, “मोदी सरकार हम से डरती है - ईडी को आगे करती है’, “नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी”, “केंद्र सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय”, “केंद्र सरकार हाय हाय’, “मोदी सरकार हाय हाय”, “केंद्र सरकारवर हल्लाबोल”, “भाजपवर हल्लाबोल’ अशा घोषणांनी त्यांनी क्रांती चौक दणाणून टाकला होता.

माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार नामदेव पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विनायक पांडे, अविनाश पाटील, कृष्णा डोणगावकर यांच्यासह राष्ट्रवादी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, किशोर पाटील, मोतीलाल जगताप, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, शहराध्यक्ष मेहराज पटेल, वीणा खरे, युवती शहराध्यक्ष अंकिता विधाते आदींची उपस्थिती होती.

आवाज कुणाचा...? काँग्रेस, राष्ट्रवादी अन‌् शिवसेनेचा

अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्याविराेधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदाेलन छेडले आहे. ‘भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अशा कारवाया करत आहे,’ असा आराेप केला जात आहे. औरंगाबादच्या क्रांती चाैकातही शुक्रवारी शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या सूचनेवरून आणि त्यांनीच ठरवून दिलेल्या क्रमानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी अन‌् मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी सरकार महाविकास आघाडी सरकार से डरती है... ईडी को आगे करती है’ अशा जोरदार घोषणा दिल्या. एकेकाळी ‘आवाज कुणाचा ...?’ अशी शिवसेनेची ओळख हाेती, मात्र आघाडीत असल्याने शिवसेेनेसाेबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचाही आवाज जनतेला ऐकायला मिळाला.

‘उसातले कोल्हे’ वाघ आला की पळून जातात : संजय केणेकर
शिवसेनेला प्रत्युत्तर देताना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचे लोक म्हणजे उसातले कोल्हे आहेत. वाघ आला की ते पळून जातात. सध्या महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यातील प्रत्येक जणाची हे सरकार फसवणूक करत आहे. त्यामुळे या सरकारविरोधात आम्ही कायम रस्त्यावर उतरत राहू. जनतेचा आवाज बनू.’ भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, ‘भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही बांगड्या भरलेल्या नाहीत. लोकशाही मार्गाने आंदोलन करताना ते उगाच अंगावर आले तर आम्हीही त्यांना चांगला धडा शिकवू.’

बातम्या आणखी आहेत...