आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्यानंतरही बीड शहराचा आणि मतदारसंघाचा विकास केवळ बोलल्या पुरतात राहिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी संदीप क्षीरसागर यांना आमदार केले, त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर आज परत चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.
काही दिवसापूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर आज नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैय्यासाहेब मोरे यांनी आज नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्राध्यापक जगदीश काळे, दिलीप गोरे, दिनकर कदम, विलास बडगे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, गणपत डोईफोडे, सादेक जमा, दादासाहेब मुंडे, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आमदाराला लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी याच शिलेदारांनी दिली परंतु पदावर गेल्यानंतर चारही नगरसेवकांना सापत्न वागणूक मिळू लागली. सन्मानाची वागणूक व कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेतृत्व म्हणून जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. हा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत उभी फूट पडली आहे. अर्धी आघाडी फुटली असून आघाडीच्या 20 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे, तर आणखीही काही जण नाराज आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.