आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदी राष्ट्रवादीचे महादेव एकलारे यांची निवड, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव, काँग्रेस, राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस, राष्ट्रवादीत मतांच्या फुटाफुटीचा खेळ

हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीच्या निवडीसाठी गुरुवारी ता. 22 झालेल्या बैठकीत सभापतीपदी राष्ट्रवादीचे महादेवअप्पा एकलारे यांची निवड झाली आहे. एकलारे यांना 29 मते तर काँग्रेसचे कैलास साळुंके यांना 21 मते मिळाली आहेत. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी असतांनाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा केलेला पराभव चर्चेचा विषय बनला आहे. तर राष्ट्रवादीचीही दोन मते फुटली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी अन काँग्रेसची महाविकास आघाडी आहे.

मात्र राष्ट्रवादीच्या रत्नामाला चव्हाण यांची शिक्षण सभापती निवड झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर अविश्‍वास ठराव पारित झाला होता. त्यामुळे नवीन सभापतीपदी कोणाची निवड होणार याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व 50 सदस्य उपस्थित होते. यामध्ये सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे महादेवअप्पा एकलारे तर काँग्रेसचे कैलास साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले.

यामध्ये एकलारे यांना 29 तर साळुंके यांना 21 मतदान झाले. काँग्रेसच्या सात सदस्यांसह भाजपाचे 11, राष्ट्रवादीच्या दोन तर एका अपक्षाने साळुंके यांना पाठींबा दिला होता. तर एकलारे यांना शिवसेनेच्या 15, राष्ट्रवादीच्या 9, काँग्रेसच्या 3 तर दोन अपक्षांनी पाठींबा दिला. सभापतीपदी एकलारे यांची निवड होताच जिल्हा परिषद सदस्यांनी जल्लोष केला. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, उपाध्यक्ष मनीष आखरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती फकीरराव मुंडे, अंकूश आहेर, नंदकिशोर खिल्लारे, राम कदम, अजय सावंत यांनी सत्कार केला.

काँग्रेस, राष्ट्रवादीत मतांच्या फुटाफुटीचा खेळ
जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 10 सदस्य आहेत. मात्र काँग्रेसच्या तीन सदस्यांनी पक्षाचे उमेदवार साळुंके यांना मतदान न देता राष्ट्रवादीचे एकलारे यांना मतदान केले. तर राष्ट्रवादीच्या 11 सदस्यांपैकी दोन सदस्यांनी काँग्रेसच्या साळुंके यांना मतदान केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या पुढाकारानेच अविश्‍वास ठराव पारित झालेल्या रत्नमाला चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या एकलारे यांनाच मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...