आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीट परीक्षेप्रकरणी सवाल:संकेतस्थळ अन् गुण वेगवेगळे, रॅकेट सक्रिय आहे का : खंडपीठ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परीक्षा एजन्सीला जनजागृतीचे आदेश

वैद्यकीय प्रवेशपूर्व (नीट) परीक्षेत काही विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील गुणतालिकेवर व प्रत्यक्षातील गुणपत्रिकेत वेगवेगळे गुण प्राप्त झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अशा प्रकारातून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे रॅकेट सक्रिय आहे की काय, असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) वर्तमानपत्रांमधून विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रगटन अथवा जाहिरात प्रकाशित करून किंवा संकेतस्थळाद्वारे व्यापक जनजागृती घडवावी. तसेच अशा फसवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तातडीने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश न्या रवींद्र घुगे व न्या एस.ए.देशमुख यांच्या खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्यात ‘नीट’च्या भिन्न आणि विसंगत निकालपत्रिकांच्या तीनहून अधिक केसेस आमच्या निदर्शनास आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमक्षही अशाच केस दाखल झाल्याचे आम्हाला समजले आहे. या प्रकरणांची वाढती संख्या आणि व्याप्ती पाहता ‘नीट’ परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत स्वत:हून पुढे येऊन आवाज उठवण्याचे आवाहन मुद्रित प्रसारमाध्यमांतून किंवा आपल्या संकेतस्थळावरून करावे. तसेच प्राप्त तक्रारींची सायबर गुन्हे शाखा अथवा सक्षम तपास यंत्रणांमार्फत तपास करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने परीक्षा एजन्सीला नोटीस बजावली व याचिकाकर्तीच्या मूळ ओएमआर उत्तरपत्रिका सादर करण्यास सूचित केले. ओएमआर उत्तरपत्रिकांमधील उत्तरे ही अल्प गुण असलेल्या निकालपत्राशी जुळत असल्याने न्यायालयाने तिची याचिका नामंजूर केली. पण अशा प्रकारे निष्पाप विद्यार्थ्यांच्या अमूल्य शैक्षणिक कारकीर्दीशी खेळणारे देशभर नेमके कुठले रॅकेट सक्रिय आहे की काय ? एजन्सीच्या संकेतस्थळाशी कुणी सायबर गुन्हेगार छेडछाड करीत आहेत काय ? याबाबत संशयास जागा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. देशात अशी किती प्रकरणे समाेर आली याचा “एनटीए’ने अभ्यासपूर्वक आढावा घ्यावा आणि मुळाशी जाऊन त्याबाबत गांभीर्याने कारवाई करावी, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. चैतन्य धारूरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मयूर सुभेदार यांनी साहाय्य केले. परीक्षा एजन्सीची बाजू ॲड आशिष जाधवर यांनी मांडली.

औरंगाबादेतील विद्यार्थिनीच्या डाऊनलोड गुणपत्रिकेत घोळ औरंगाबादच्या भूमिजा राठोड या विद्यार्थिनीने ‘नीट’ परीक्षा दिली होती. याचा निकाल ७ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर झाला. भूमिजाने अधिकृत वेबसाइटवरून गुणपत्रिका डाऊनलोड केली असता तिला ७२० पैकी ६६१ गुण प्राप्त झाल्याची नोंद होती. त्यामुळे डॉक्टर होण्याच्या तिच्या आशा पल्लवित झाल्या. पण ३ दिवसांनंतर तिने पुन्हा ‘एनटीए’च्याच संकेतस्थळावरून निकालपत्र डाऊनलोड केले असता त्यात अवघे २१८ गुण प्राप्त झाल्याचे दिसले. यामुळे व्यथित होऊन भूमिजाने एजन्सीला ई-मेल पाठवून दाद मागितली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने याचिका दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...