आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी:वर्ग एक-दोनच्या भरतीत 161 जागांची नव्याने भर ; 184 महिला, 23 खेळाडूंना संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एमपीएससीमार्फत वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी पदांच्या भरतीत १६१ जागांची भर पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ४६२ जागा भरण्याचे निश्चित केले होते. आता ही भरती ६२३ जागांसाठी होईल. त्यात सर्वाधिक १३९ जागा उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या आहेत. उपजिल्हाधिकारी ३३, तर पोलिस अधिकाऱ्यांच्या ४१ जागा आहेत. २१ ऑगस्ट रोजी पूर्वपरीक्षा झाली. मुख्य परीक्षेनंतर एप्रिल-२०२३ पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आयोगाने कळवले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मे २०२२ रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात ऑगस्ट-२०२२ दरम्यान गट-अ आणि गट-ब या संवर्गातील ४६२ जागांची भरती केली जाणार होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा दुरुस्तीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची ३३ पदे असून महिलांसाठी १० तर खेळाडूंसाठी एक जागा राखीव आहे. डीवायएसपी, एसीपींच्या ४१ जागांपैकी २९ पुरुष, तर १२ महिला राहतील. जीएसटीच्या सहायक आयुक्तांच्या ४७ जागांपैकी ३१ पुरुष, तर १५ महिला आहेत. तहसीलदारांच्या २५ जागांपैकी १७ पुरुष, तर ७ महिला आहेत. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या १३९ जागांपैकी ९२ पुरुष, तर ३९ महिला आहे. खेळाडूंसाठी ८ जागा आहेत. स्कूल इन्स्पेक्टरच्या ८८ जागांपैकी ५५ पुरुष, २९ महिलांचा समावेश असून ४ खेळाडूंना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. गटविकास अधिकारी पदाच्या १४ जागा असून ९ पुरुष, तर ५ स्त्रियांना संधी दिली जाईल. सहायक गटविकास अधिकाऱ्याच्याही ८० जागा आहेत. त्यापैकी ५३ पुरुषांना, तर २४ जागी महिलांना सामावून घेतले जाणार आहे. खेळाडूंना ३ जागांवर आरक्षण आहे.

सीडीपीओच्या २८ तर मुख्याधिकाऱ्यांच्या २२ जागा भरणार बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच सीडीपीओच्या २८ जागा असून १८ पुरुष तर ९ स्त्रिया तर १ जागेवर खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. प्रकल्प अधिकारी-६, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी-४, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कक्षाधिकारी-४, मंत्रालयातील कक्षाधिकारी-५, भूमी अभिलेख विभागात उपअधीक्षक-३, सहायक निबंधक सहकारी संस्था-२, राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपअधीक्षक आणि सहायक आयुक्तांच्या प्रत्येकी ३ जागा भरण्यात येणार आहेत. सहायक प्रकल्प अधिकारी-४२ जागा भरण्यात येतील. त्यामध्ये २७ पुरुष तर १३ महिला आहेत. २ जागांवर खेळाडूंना संधी दिली जाईल.

ऑगस्टमध्ये झाली पूर्वपरीक्षा, सामाजिक आरक्षणाचे पालन करणार पूर्वपरीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी झाली. लवकरच निकाल जाहीर होईल. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी अर्ज घेतले जातील. मुख्य परीक्षा होऊन त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखती पार पडतील. साधारणत: एप्रिल-२०२३ पर्यंत भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या सर्व जागांसाठी सामाजिक आरक्षणाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...