आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी सुटीवर असताना जी. श्रीकांत हजर झाले. प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पदाची सूत्रे जी. श्रीकांत यांच्या हाती सोपवली. तीन ते चार दिवसांत चौधरी परत येणार आहेत. जुन्या आयुक्तांना निरोप देता आला नाही यांची खंत अनेकांनी व्यक्त केली.
ज्या घरकुल घोटाळा प्रकरणावरून मनपा आयुक्तांच्या बदलीची चर्चा झाली, त्याबद्दल नवनियुक्त महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासोबत ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी मंदार जोशी यांनी साधलेला थेट संवाद.
घरकुल योजनेच्या चौकशीचे काय होणार?
उत्तर : सर्वप्रथम या सगळ्या प्रकारचा रिव्ह्यू घेतला जाईल. मी वर्तमानपत्रात याबाबत वाचले तेवढेच मला माहिती आहे. मात्र, चुकीला माफी नाही. जे चुकीचे काम करतील त्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही. उलट त्यांच्यावर आतापेक्षा अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचा पवित्रा कायम राहील.
अधिकाऱ्यांना काय सूचना?
उत्तर : महापालिकेत कोण काय काम करते याचा अंदाज घ्यायला मला अधिक काळ लागणार आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म व्हिजन निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरासाठी तुम्ही काय करणार हे मला सांगा. पाच मंत्री व एक विरोधी पक्षनेते या शहराला मिळाले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी सुवर्णकाळ आहे.
शहर जेवढे वर्ष मागे पडले तेवढे त्याला पुढे नेण्याची वेळ आली आहे. मनपा अधिकाऱ्यांनादेखील आता ‘कॉर्पोरेटे’सारखा ‘केआरए’ असेल का?
उत्तर : का असणार नाही? मी शहराच्या विकासासाठी चार गोष्टी सांगण्यापेक्षा या शहरासाठी मी काय करणार हे अधिकाऱ्यांनी सांगितले तर काम अधिक चांगले होईल. शहराच्या विकासाचा दृष्टिकोन नसलेल्यांनी निघून गेले तरी चालेल, असे मी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. ज्यांना काही काम करायचे आहे तेच माझ्यासोबत असतील. नाहीतर मी कारवाई करण्यापेक्षा ते स्वत:हूनच बाजूला झालेले कधीही चांगले.
विविध कामांच्या सुमारे हजार कोटींच्या निविदा निघणार आहेत, त्यांचाही पुनर्विचार होईल का?
उत्तर : प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच पुढे निर्णय घेण्यात येतील. शहराचा एक नागरिक म्हणून मनपाचा कारभार करताना नागरिकांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी व समस्यांचा अभ्यास केला जाईल. शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दररोज पाणी कसे देता येईल, त्यातल्या त्यात ‘२४ तास ७ दिवस’ पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. रस्त्यांची कामेदेखील हाती घेतली जातील.
मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही नियोजन असेल का?
उत्तर : महापालिकेच्या करांची वसुली वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. मनपाच्या कारभारात टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील. करवसुलीचा अनुभव असल्यामुळे बिल कलेक्टर यांच्याकडून कराची जास्तीत जास्त वसुली केली जाईल. नागरिकांना घरबसल्या कर भरण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एका हाताने कराची वसुली करून दुसऱ्या हाताने नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.