आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गतवर्षी कोल्हापूर-सांगलीच्या महापुरात सर्वस्व गमावलेल्या ७१० नागरिकांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने सुखसमृद्धी घेऊन आली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर न्यास आणि जयसिंगपूर येथील शांती विद्या ज्ञान संवर्धन समितीच्या वतीने साडेचार कोटी रुपये खर्चून या कुटुंबांना नवी कोरी घरकुले बांधून देण्यात आली असून त्यापैकी ३५० पेक्षा अधिक नागरिकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. विशेष म्हणजे ९० टक्के लोकांना त्यांच्या पूर्वीच्या घरांप्रमाणेच घरे बांधून देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील संकटासाठी बिहार आणि राजस्थानच्या जैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
सन २०१९ मधील या नैसर्गिक संकटात मदतीसाठी राज्यभरातून मदतीचे हात सरसावले. या नागरिकांना कायमस्वरूपी उभे करण्यासाठी जैन समाजातील नागरिकांनी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परमपूज्य मुनिश्री सुधासागरजी आणि प्रमाणसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने जयसिंगपूरची शांतिविद्या ज्ञान संवर्धन समिती, श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराने श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र चुलगिरी बावनगजाजी ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांसाठी वात्सल्य आधार अभियान २०१९ सुरू केले, तर संत शिरोमणी आचार्य १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर न्यास, ईश्वरपूर, इस्लामपूर यांच्या वतीने बाढ सहायता निधी उभारण्याचा निर्णय झाला. त्यावर १०८ आगमसागरजी, पुनीतसागरजी आणि सहजसागरजी महाराज यांनी वैयक्तिक लक्ष ठेवले. मदतीचा प्रस्ताव देशभरातील जैन समाजाच्या मंदिर, आश्रमात पोहोचला. ठिकठिकाणच्या सत्संगात मदतीसाठी आवाहन करण्यात आले. बघता बघता मदतीची भलीमोठी रक्कम जमा झाली.
जुन्या घराएवढेच नवीन घर : नवीन घर बांधण्यासाठी हातात पुरेसा पैसा नसलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. गरजूंकडून रीतसर अर्ज मागवले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. छाननी केल्यावर ७१० नागरिकांना तातडीच्या घराची आवश्यकता जाणवली. यानंतर मासिक वेतनावर सिव्हिल इंजिनिअर नेमण्यात आले. त्यांनी निवड झालेल्या नागरिकांच्या जुन्या घराची माहिती घेतली. बहुतांश लोकांची कागदपत्रे वाहून गेली होती. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या जुन्या घराचा अंदाज घेतला. ९० टक्के लोकांना आहे त्याच जागेवर जुन्या घराएवढे, तर काहींना शहराबाहेर घर देण्यात आले. नोव्हेंबर २०१९ मध्ये उपक्रमाला सुरुवात झाली. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यातील जवळपास प्रत्येक शहरातून जैन बांधव सुटीच्या दिवशी सांगली-कोल्हापुरात परिश्रम घ्यायचे. टप्प्याटप्प्याने लोकांना घराचा ताबा देण्यात आला. ३५० लोकांनी यंदाच्या दिवाळीत नवीन गृहप्रवेश केला.
मदतीचा ओघ सुरूच : महाराष्ट्रातील संकटासाठी बिहार आणि राजस्थानच्या जैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. मदतीचा ओघ अजूनही सुरू आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यात गरजूंचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती श्री दिगंबर जैन सेवा समितीचे औरंगाबाद अध्यक्ष व्ही. ए. मनोरकर यांनी दिली. उपक्रमात शांतिविद्याचे तात्याभय्या नेजकर आणि चंद्रप्रभ मंदिराचे विजय राजमाने यांचे सहकार्य लाभले.
कोरोनाकाळातही ५ कोटींची मदत : घरबांधणीसाठी ४.५ कोटी रुपये, धान्यवाटप- ४८.०८ लाख, चारावाटप-२६.४९ लाख, शैक्षणिक साहित्य-३.९४ लाख, वैद्यकीय मदत-१.४२ लाख, घरदुरुस्ती-३.४० लाख, तर कोरोनाच्या काळात धान्यवाटपासाठी ७.५० लाख असे एकूण ५,४०,८३,७९१ रुपये चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिरातर्फे खर्च करण्यात आले. त्याशिवाय गाय-बैल जोडी, पापड, शेवया मशीन आदींचे वितरणही करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.