आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:ईपीएफओकडे नवीन सदस्य नोंदणी 218% वाढली, 19% कामगारांना नवीन नोकरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊनमध्ये नवीन आस्थापनांत 72% वाढ

लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत ईपीएफओकडे ८३६७ नवीन उद्योग-व्यवसायांची नोंद झाली. येथे काम करण्यासाठी ३.१८ लाख नवीन सदस्यांची गरज भासली. तर कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या १९% कामगारांना नवीन नोकरी लागल्याचेही ईपीएफओच्या अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकताच अंतरिम पेरोल डेटा प्रकाशित केला. लॉकडाऊन २३ मार्चपासून सुरू झाला. त्यापूर्वीच उद्योगांमध्ये कोरोनाचे संकट जाणवू लागले होते. परप्रांतीय कामगार गावी परतण्यास सुरुवात झाली. याचे सर्वाधिक परिणाम एप्रिल आणि मे महिन्यात जाणवलेे. त्या दृष्टीने या काळातील ईपीएफओ आकडेवारीला महत्त्व आहे. देशभरात ईपीएफओचे ६ कोटींहून अधिक सदस्य आहेत.

हाॅटेल, शिक्षण क्षेत्रांत शुकशुकाट
कोरोना-लॉकडाऊनमुळे बांधकाम, हॉटेल, वाहतूक, शिक्षण, विद्युत, यांत्रिकी, वस्त्रोद्योग, उत्पादन व अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगारावर परिणाम झाला. विशेषज्ञ सेवा क्षेत्र म्हणजे मनुष्यबळ संस्था, खासगी सुरक्षा रक्षक यांसारख्या क्षेत्रात पूर्वी दरमहा ४ लाख नवीन सदस्य जाेडले जात होते. एप्रिलमध्ये यात अवघे ८० हजार सदस्य जोडले गेले. जूनमध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांत परिस्थिती सुधारत असताना शिक्षण क्षेत्रात मात्र अजूनही शुकशुकाट आहे.

एप्रिलमध्ये ४८५३ तर मेमध्ये ८३६७ नवीन आस्थापनांची नोंद झाली. महिनाभरात नव्याने नोंद होणाऱ्या आस्थापनांचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले. एप्रिलमध्ये १.६७ लाखाच्या तुलनेत मेमध्ये २.६७ लाख म्हणजेच ६६ टक्के नवीन सदस्य जोडले गेले. एप्रिलमध्ये ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये १ लाख नवीन सदस्य जोडले गेले. मेमध्ये ही संख्या ३.१८ लाख झाली. महिनाभरात नवीन सदस्य नोंदणीचे प्रमाण २१८ टक्क्यांनी वाढले. विशेष म्हणजे या सर्व सदस्यांचे पीएफ योगदान जमा करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये २.९७ लाख सदस्य कमी झाले होते. मेमध्ये हे प्रमाण २.३६ लाखांवर गेले.

नोकरीत बदलाकडे कल : लॉकडाऊनमुळे काही जण शहर सोडून गावाकडे गेले. मात्र, १९ टक्के लोकांनी पीएफ हस्तांतरित केला. यावरून रिक्त जागांचा फायदा घेत १९% सदस्यांनी नोकरीत बदल केल्याचे स्पष्ट होते.