आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:चिकलठाणा एमआयडीसीत नवीन पाइपलाइन ; इतर सुविधांसाठी 10 कोटी

वाळूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी अधिकारी आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) पदाधिकाऱ्यांची २२ ऑगस्ट रोजी बैठक झाली. या वेळी उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या. त्याचे लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. मार्च अखेरपर्यंत चिकलठाणा एमआयडीसीत नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी, सीएमआयएचे माजी अध्यक्ष कमलेश धूत, दीपक तोष्णीवाल, रवींद्र मानवतकर आदी उपस्थित होते.

जोशी म्हणाले की, एमआयडीसी कार्यालयाकडून औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, स्टॉर्म वॉटर डक्ट, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांसाठी सुमारे ३२ कोटी खर्च करण्यात आले. यात तब्बल १० कोटी रुपयांची वाढ करत आगामी काळात ४२ कोटींचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, लिंक रोड विस्तारीकरण, पावसाचे पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. वाळूजमध्ये कार्बन तंत्रज्ञानावर आधारित ट्रीटमेंट प्लँट विकसित करून त्यामधून ५ एमएलडी पाण्याचा पुनर्वापराकरिता शुद्धीकरण करण्यात येणार आहे. वाळूज, रेल्वेस्थानक, चिकलठाणा, शेंद्रातील सदस्यांनी उद्योगविषयक विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, ट्रक टर्मिनलची गरज, मोठ्या वाहनांची पार्किंग आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक समस्या, उद्योग वसाहतीमधील मुरूम चोरी आणि इतर गुन्हे आदींवर बोलताना कमलेश धूत म्हणाले, आगामी काळात एमआयडीसी अधिकारी आणि उद्योजक यांच्यामध्ये दुवा बनण्याचे काम संस्था करेल. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली आहे. यामुळे उपसा क्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली. यावर उपाय म्हणून जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी दिली. एकूण २२ किमी लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यात येईल, यापैकी १५ किमी लांबीचे पाइप उपलब्ध झाले असून, ६ किमी लांबीचे पूर्ण झाले आहे. चिकलठाणातील उद्योजकांनी एमआयडीसी आणि मनपा यांच्याकडे सेवा विखुरल्या गेल्या असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. त्यावर उद्योजकांची तयारी असेल तर सेवा हस्तांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाला पत्र द्यावे, जळगाव एमआयडीसीच्या धर्तीवर सेवा देता येऊ शकतील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...