आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अतिरेकीवृष्टी!:राज्यात 2 दिवस अतिवृष्टीचे, जालना जिल्ह्यातील 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद, मराठवाड्यासह 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर | गेल्या १० वर्षांत दुधना नदीला प्रथमच जून महिन्यात पूर आला. नदी दुथडी भरून वाहत असल्याने गोलापांगरी, काजळा या भागातील शेताचे असे तळे झाले.
  • या जिल्ह्यांत 26 व 27 जून या काळात 64.5 ते 115.5 मिमी पावसाची शक्यता

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. दोन दिवसांत बहुतांश भागात अतिवृष्टीचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. राज्याच्या किनाऱ्यावर उत्तर अरबी समुद्रात जमिनीपासून २.१ किमी उंचीवर चक्राकार स्थिती असल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, प.महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी २६ आणि २७ जून रोजी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे.

207 मिमी पाऊस रोषणगाव मंडळात!

आैरंगाबाद | गुरुवारी मुसळधार पावसाने मराठवाडा चिंब झाला. जालना जिल्ह्यातील ६ मंडळांत अतिवृष्टी झाली. बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात तब्बल २०७ मिमी पाऊस झाल्याने जमिनी खरडून गेल्या, पिकांचे नुकसान झाले. बीडच्या धारूर, गेवराई तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादच्या भूम तालुका, तेर, येडशी, वाशी, मोहातही पाऊस बरसला.

तीन जिल्ह्यांनी सरासरी ओलांडली

औरंगाबाद २०६ मिमी १६५%

जालना १९१ मिमी १४४%

बीड १४४ मिमी ११२%

मराठवाड्यासह 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट

नाशिक, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसाठी कुलाबा वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांत 26 व 27 जून या काळात 64.5 ते 115.5 मिमी पावसाची शक्यता.

या मंडळांत अतिवृष्टी

अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री मंडळात ८८ मिमी, जामखेड १२९, रोहिलागड ११५, सुखापुरी ७५, बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात २०७ तर शेलगाव मंडळात ६७ मिमी पाऊस झाला. या मंडळातील सोयाबीन तसेच मका पिकांसह इतर कडधान्ये असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ठिबक सिंचनच्या नळया तसेच इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे. रोषणगाव तसेच शेलगाव या दोन्ही मंडळात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती.

१५ दिवसांत १०६% पाऊस

मराठावाड्यात २५ जूनपर्यंत १५ दिवसांत कमी अधिक फरकाने सरासरीच्या तुलनेत १०६.५५ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, धरणे आजही तहानलेली आहेत. आजपासून २९ जूनपर्यंत जेथे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, बाष्पयुक्त ढगांची गर्दी होईल अशा पोषक वातावरणाच्या ठिकाणीच जोरदार पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी, खत व फवारणीचे योग्य शास्त्र शुद्ध पद्धतीने करणे उचित ठरेल.

उस्मानाबाद जिल्ह्यातही हजेरी

गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरत पेरण्याही उरकल्या. मागील पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली हाेती. गुरुवारी दुपारी भूम तालुक्यासह ईट व परिसर, तेर, येडशी, वाशी, मोहा पाथरूड परिसरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ६८५.५० मिलीमीटर इतकी आहे. यापैकी आतापर्यंत १३५.०५ मिमी पाऊस झाला आहे.

गेवराई शहरात भिंत कोसळून वृद्धा गंभीर जखमी

बीड जिल्ह्यातील धारूर, गेवराई तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धारूर तालुक्यातील चिंचपूर, गांजपूर गावात घरावरील पत्रे उडाली. चिंचपूर येथे अंगणवाडीवरील पत्रे उडून गेली. गेवराई शहरातील बोर्डे गल्लीतील द्रौपदी उदावंत (वय ७०) यांच्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली. दगड त्यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

0